Coronavirus: एक लाख रुग्ण कोरोनामुक्त; ठाणे जिल्हा प्रशासनाला मिळाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:31 AM2020-08-26T00:31:12+5:302020-08-26T00:31:24+5:30
आता मृत्युदर रोखण्याचे आव्हान
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातही हळूहळू कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत तब्बल एक लाख ६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, जिल्ह्यासाठी ही समाधानाची आणि दिलासादायक बाब ठरली आहे. एकूण एक लाख १५ हजार ६२४ रुग्णांपैकी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही १२ हजार २६२ एवढी आहे. तर आतापर्यंत तीन हजार ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, हा मृत्युदर रोखण्याचे आव्हान आता प्रशासनांसमोर आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातही मार्चपासूनलॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये त्याचा फैलाव जिल्ह्याच्या विविध महापालिकांच्या ठिकाणी होताना दिसून आला. जून आणि जुलैमध्ये तर रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये बेडही मिळणे मुश्कील होऊन बसले होते. परंतु, जुलै महिन्याच्या मध्यानंतर आणि आॅगस्टमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक कमी होऊ लागली.
जिल्ह्यातील महापालिकांनी केलेल्या उपाययोजना, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, आया आदींसह पोलीस यंत्रणा व इतर शासकीय यंत्रणा तसेच राजकीय मंडळींनी घेतलेली काळजी, नागरिकांप्रति केलेली जनजागृती यामुळेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बºयाच प्रमाणात यश आले आहे. जुलैपर्यंत प्रतिदिन दीड हजार ते दोन हजार रुग्ण आढळत होते. परंतु, आॅगस्ट महिन्यात ही संख्या खाली आली आहे. सोमवारी जिल्ह्यात ८५९ रुग्ण आढळले आहेत. या यशाचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केले आहे. आता मृत्युदर रोखण्यासाठीही ठाणे महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्यात एका कोविड सेंटर रुग्णालयापाठोपाठ आता कळवा, मुंब्य्रातही हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. दरम्यान, कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक कोरोनामुक्ती
ठाणे 22004
कल्याण-डोंबिवली 23095
नवी मुंबई 19668
मीरा-भार्इंदर 9825
उल्हासनगर 7059
भिवंडी 3612
अंबरनाथ 4231
बदलापूर 3493
ठाणे ग्रामीण 7075