Coronavirus: १५ प्राथमिक शिक्षकांमध्ये आढळली कोरोनाची लक्षणे; विलगीकरणाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 12:18 AM2021-01-29T00:18:11+5:302021-01-29T00:18:28+5:30
जिल्ह्यातील २६१८ शिक्षकांची अँटिजेन टेस्ट, ग्रामीण भागातील ४२२ शाळा सुरू झालेल्या आहेत. यासाठी शिक्षकांची कोरोना अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेच्या दोन हजार ६१८ शिक्षकांची अँटिजेन टेस्ट केली आहे. यातून १५ शिक्षकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांना विलगीकरणाचा सल्ला ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे, असे शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या अँटिजेन टेस्टची सोय माध्यमिक शिक्षण विभागाकडेही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.
तब्बल नऊ महिने बंद असलेल्या या पाचवी ते १२ वीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशास अनुसरून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या तपासणीप्रमाणे माध्यमिक शिक्षकांची आजच्या दुसऱ्या दिवशी माहिती उपलब्ध होणे अपेक्षित होते. पण माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या अँटिजेन तपासणी अहवालाच्या माहितीबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडे उदासीनताच दिसून आली. विद्यापीठाच्या कामकाजाची जबाबदारी पार पडत असलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे, यांनी माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले दहितुले यांच्याकडून माहिती घेण्यास सांगितले. मात्र, दहितुले यांनीही माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना अँटिजेन तपासणी अहवालाबाबत मौन बाळगले आहे.
ग्रामीण भागातील ४२२ शाळा सुरू झालेल्या आहेत. यासाठी शिक्षकांची कोरोना अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्राथमिक शाळेचे दोन हजार ६१८ शिक्षक निगेटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहेत; तर तब्बल १५ शिक्षक पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यांना विलगीकरणाचा सल्ला दिल्याचे दहितुले यांनी सांगितले. या प्राथमिक विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी कोरोनाच्या उपाययोजना काटेकोरपणे पाळण्यात येत आहेत. त्यासाठी समग्र शिक्षण अनुदानाची रक्कम शाळांना वाटप केली आहे; तर शिक्षकांच्या प्रमाणातील ४ टक्के सादिल खर्चही वाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य खरेदी
विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेले कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. यासाठी सादिल खर्चाची रक्कम शासनाने दिली आहे. ती लवकरच शाळा वाटप करण्यात येईल. याशिवाय ग्रामपंचायतींनी यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही कमी राहणार नाही, याची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.