Coronavirus : नगरसेवकांचं दातृत्व! कोरोनाग्रस्तांसाठी मोरे दाम्पत्याने दिला ३० लाखांचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 04:30 PM2020-04-09T16:30:29+5:302020-04-09T16:31:02+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका भारती मोरे यांनी देखील स्वता:चा ३० लाखांचा नगरसवेक निधी खर्च करण्यासाठी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना गुरुवारी पत्र दिले आहे.
डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरांतून पंतप्रधान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सहाय्य करण्यात येत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील समाजातील विविध घटकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका भारती मोरे यांनी देखील स्वता:चा ३० लाखांचा नगरसवेक निधी खर्च करण्यासाठी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना गुरुवारी पत्र दिले आहे.
त्या विनंती अर्जामध्ये कोरोनाग्रस्तांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी तसेच तो आजार रोखण्यासाठी ज्या आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, त्यासाठी तो नगरसेवक निधीचा वापर करावा, अशी मोरे दाम्पत्याने मागणी केली आहे. प्रभागातील गटार, पायवाटा सुस्थितीत असून त्याच त्याच बाबी करण्यापेक्षा नागरिकांच्या आरोग्यासाठी तो निधी खर्च व्हावा. त्यांचे आरोग्य राहिले तरच महापालिकेला शोभा असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राजेश मोरे आणि भारती मोरे यांच्याकडील प्रत्येक १५ लाखांचा असा निधी वापरावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. नगरसेवक निधी वापरण्यात यावा यादृष्टीने मोरे यांनी पाठवलेले महापालिकेतील पहिलेच पत्र असल्याची माहिती समोर आली आहे.