coronavirus: क्रीडासंकुलातील कोविड रुग्णालय आजपासून खुले, १८५ बेडची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:44 AM2020-07-07T01:44:09+5:302020-07-07T01:44:16+5:30
या रुग्णालयाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या रुग्णालयामुळे रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागणार नाही, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.
कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून रुग्णालयांत बेड नसल्याचे त्यांचे हाल होत आहेत. मात्र, महापालिकेने डोंबिवली क्रीडासुंकलातील बंदीस्त सभागृहात उभारलेले १८५ बेडचे डेडीकेटेड कोविड रुग्णालय मंगळवारपासून रुग्णांसाठी सुरू होत आहे. या रुग्णालयाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या रुग्णालयामुळे रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागणार नाही, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.
महापलिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनीता राणे, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे आदी मान्यवरही रुग्णालयाच्या पाहणीवेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, या कोविड रुग्णालयात १५५ आॅक्सिजनयुक्त व ३० आयसीयूयुक्त बेड आहेत. पूर्णपणे आॅक्सिजनची सुविधा असलेले हे कोविड रुग्णालय तात्पुरते उभारले असले तरी ते एखाद्या सुसज्ज रुग्णालयाच्या तोडीचे अद्ययावत असे आहे. दरम्यान, डोंबिवली जिमखाना, कल्याणमध्ये फडके मैदानाजवळील आर्ट गॅलरी येथेही कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्यामुळे जवळपास एक हजार बेडची येत्या १० दिवसांत उपलब्ध होतील. त्याचबरोबर पाटीदार भवन येथेही रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वन रूपी क्लिनिक्सचे राहुल घुले यांनी हे रुग्णालय उभारण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. तेथे पुरेसे डॉक्टर व नर्स उपलब्ध करून दिले आहेत.
यावेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, ‘डोंबिवलीतील मनपाच्या शास्त्रीनगर कोविड रुग्णालयात बेडची संख्या कमी असल्याने तेथे ताण येत होता. परंतु, क्रीडासंकुलातील डेडीकेटेड कोविड रुग्णालय हे शास्त्रीनगरचे विस्तारित रुग्णालय आहे. आॅक्सिजनची गरज असलेले रुग्ण वाढताहेत. मनपा हद्दीतील कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढविले आहे. अधिग्रहीत केलेल्या रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणोच उपचाराचे बिल आकारायचे आहे. मात्र, तेथे जास्त बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णालयांच्या विरोधात कारवाई केली जाईल.’
...तर रुग्णालयांवर कारवाई होईल
कोरोना नसलेल्या व अन्य आजारांच्या रुग्णांना खाजगी रुग्णालये उपचारासाठी दाखल करून घेत नाहीत. या संदर्भातही तक्रारी आल्या आहेत. त्यासाठी एक भरारी पथक नेमले असून, ते त्याची पाहणी करेल. यावेळी रुग्णालय रुग्ण दाखल करून घेत नसल्याचे आढळल्यास त्या रुग्णालयाविरोधात कारवाई केली जाईल, असे सूर्यवंशी म्हणाले.