CoronaVirus: खासगी दवाखाने बंद ठेवणार्या डॉक्टरांवरील कारवाईचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:07 PM2020-03-27T14:07:14+5:302020-03-27T14:07:40+5:30
जर कोणी खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले आणि तसे त्याचे पुरावे प्रशासनाला मिळाले, तर प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल,
ठाणे : जिल्ह्यातील काही खाजगी दवाखाने बंद रहात आहेत, याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. जर कोणी खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले आणि तसे त्याचे पुरावे प्रशासनाला मिळाले, तर प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल, अशी तंबी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांच्या डाँक्टरांना दिली आहे.
खासगी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर जिल्हा प्रशासन कारवाई करू शकते, याची जाणीव डॉक्टरांनी ठेवावी. त्यामुळे दवाखाने बंद ठेवू नयेत, असा इशारा नार्वेकर यांनी दिला आहे. आजारी व्यक्तींना दवाखाण्यात जाण्यासाठी संचारबंदीच्या काळात वाहन सेवा नसल्याने अनेकदा त्यांची गैरसोय होते आहे. हे लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने फोनवर रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व प्रभागांमध्ये रिक्षा संघटनेशी चर्चा करून शहरात विविध ठिकाणाहून २५ अबोली महिला रिक्षाचालक व त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात येणार आहेत. त्यांना फोन करून बोलविता येईल. याचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.
सर्व दुकाने त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील -
राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी, दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी सर्व दुकाने त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील. तसेच घरपोच किंवा सोसायटी परिसरात सेवा उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशाा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.