coronavirus: प्रशासनाच्या हलगर्जीमुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:46 AM2020-05-15T03:46:58+5:302020-05-15T03:47:04+5:30
राज्य शासनाने ५५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाच्या सर्व्हेची किंवा इतर कामे देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. तशा आशयाचे पत्रही ठाणे महापालिकेला युनियनच्या माध्यमातून देण्यात आले होते.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील सर्व्हेअरचा बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ते मे महिन्याच्या अखेरीस सेवेतून निवृत्त होणार होते. परंतु, त्या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. विशेष म्हणजे त्यांना परिमंडळ-१ मधील कोरोनाच्या सर्व्हेची जबाबदारी दिली होती. परंतु, हे काम आजारपण आणि वयोमानामुळे शक्य नसल्याने मला आॅफिसमधीलच काम द्यावे, अशा आशयाचे पत्र प्रभाग समिती आणि शहर विकास विभागाला दिले होते. मात्र, प्रशासनाने काहीच हालचाल केली नाही. अशातच त्यांचा मृत्यू झाल्याने ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्य शासनाने ५५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाच्या सर्व्हेची किंवा इतर कामे देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. तशा आशयाचे पत्रही ठाणे महापालिकेला युनियनच्या माध्यमातून देण्यात आले होते. त्यानुसार, पालिकेनेदेखील परिपत्रक काढून ५५ वर्षांवरील व्यक्तींना कोविडच्या कामास घेऊ नये, असे सांगितले आहे. असे असतानाच या कर्मचाºयासोबत झालेला प्रकार दुर्दैवी आहे. दोषींवर कारवाई करून ५० लाखांच्या विम्याचा लाभ मृताच्या कुटुंबीयांना देण्याची मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे चिटणीस चेतन आंबोणकर यांनी केली.