Coronavirus Death toll: कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी माणसं साथीपासून दूर; रीतीप्रमाणे अंत्यविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 01:12 AM2021-03-25T01:12:03+5:302021-03-25T01:12:26+5:30

घरातील व्यक्ती गेल्याची भावना

Coronavirus Death toll: People who perform coronavirus funerals away from companions; Funeral as usual | Coronavirus Death toll: कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी माणसं साथीपासून दूर; रीतीप्रमाणे अंत्यविधी

Coronavirus Death toll: कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी माणसं साथीपासून दूर; रीतीप्रमाणे अंत्यविधी

Next

अजित मांडके

ठाणे  : गेले वर्षभर कोरोनाचा कहर सुरू असून, ठाण्यातील चार स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करणारी माणसे या महामारीपासून दूरच असल्याचे दिसून आले आहे. चार स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सुमारे ४९ पैकी केवळ दोनचजणांना सुरुवातीच्या काळात कोरोना झाला होता. परंतु, त्यानंतर अद्याप एकालाही त्याची लागण झालेली नाही. असे असतानाही एखाद्या घरच्याप्रमाणेच कोरोनाग्रस्तांवर ते अंत्यसंस्कार करीत आहेत. 

ठाणे शहरात आजघडीला ६८ हजार ८५२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील ६३ हजार २०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; तर आतापर्यंत एक हजार ४२६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूचे प्रमाण कमी असले तरीदेखील मनात भीती कायम आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला ५४ च्या आसपास स्मशानभूमी आहेत. त्यातील वागळे, जवाहरबाग, कळवा आणि येऊर येथे असलेल्या स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यातही जवाहरबाग स्मशानभूमी ही ठाण्यातील सर्वात मोठी असल्याने तिथे अंत्यविधीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे येथे तीन शिफ्टमध्ये २४ कर्मचारी कार्यरत आहेत, तर वागळे, कळवा येथे १२ आणि येऊर येथे एक कर्मचारी कार्यरत आहे.  या सर्वांच्या खांद्यावर कोरोनाला सुरुवात झाल्यापासून मोठी जबाबदारी पडली आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला उचलण्यापासून त्याच्यावर रितसर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीदेखील त्यांच्याच खांद्यावर आहे. हे करीत असताना स्वत:च्या जिवाची काळजी घेण्याचे कामही त्यांना करावे लागत आहे.

परंतु, एखाद्यावर अंत्यसंस्कार करताना जो आपल्या घरातीलच असल्याचेसारखे अगदी रितीरिवाजाप्रमाणे अंत्यविधी केले जात आहेत. त्यामुळे अनेकांची मनेदेखील यामुळे पिळवटून निघाली आहेत. परंतु, मनावर दगड ठेवून ते आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यातूनच वर्षभरात केवळ दोनजणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट घालणे, वारंवार हात सॅनिटाईज करणे आदी काळजी हे कर्मचारी घेत आहेत. तसेच घरी जाण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करणे आणि घरी गेल्यानंतरही पुन्हा गरम पाण्याने अंघोळ करणे असा दिनक्रम या कर्मचाऱ्यांचा सुरू आहे. परंतु, घरातदेखील सर्वांपासून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच ते वास्तव्य करीत असल्याचे सांगतात.

आम्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर रितसर अंत्यसंस्कार करीत असतो. ते करीत असताना कधीकधी मन घट्ट करावे लागते. तसेच आमच्या घरच्यांसह स्वत:चीदेखील काळजी घेतो. अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, घरी जाण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करणे तसेच घरी गेल्यानंतरही पुन्हा अंघोळ करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घरात वावरणे, असा नित्यक्रम ठरला आहे. - जितू मकवाना, स्मशानभूमीतील कर्मचारी

Web Title: Coronavirus Death toll: People who perform coronavirus funerals away from companions; Funeral as usual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.