coronavirus: लॉकडाऊन संदर्भात लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, एकनाथ शिंदे यांची सूचक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 02:47 PM2021-04-10T14:47:47+5:302021-04-10T14:49:03+5:30
coronavirus in Maharashtra : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन संदर्भात जो निर्णय घेण्यात येणार आहे तो लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
ठाणे - आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन संदर्भात जो निर्णय घेण्यात येणार आहे तो लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत . राज्यात लस आणि रेमडीसीव्हरच्या इंजक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना या दोन्हीचा साठा कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे केंद्राशी बोलणे सुरु असून राज्याच्या लोकसंख्येनुसार केंद्राने लस उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वडील, पत्नी तसेच स्वतः एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या सामान्य रुग्णालयात जाऊन आज लस घेतली असून यावेळी त्यांनी इतरांना देखील लस घेण्याचे आवाहन केले.
राज्यासह ठाणे जिल्ह्यात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. पुरेशी लस उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील काही लसीकरण सेंटर असाक्षरशः बंद ठेवावी लागली आहे. ठाणे महापालिका हद्दीत तर आज आणि उद्या लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना लसीच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत विचारणा केली असता कोणत्याही परिस्थितीमध्ये लस कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक आहे त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा अधिक वाढवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या भागात अधिक तपासण्या करण्यासोबतच आरोग्य कर्मचारी देखील वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेमडीसीव्हरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत कोरोना हे मोठे संकट असून सर्वानी एकत्र येऊनच या संकटाचा सामना करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अशा संकट समयी काळबाजार करण्याची भूमिका योग्य नव्हे असे त्यांनी सांगितले आहे.
वेळ पडल्यास हॉटेल ताब्यात घेणार
कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आता बेड देखील कमी पडत आहे. कोणत्याच नागरिकाला बेड मिळणार नाही अशी एकही तक्रार येता कामा नये यासाठी वेळ पडल्यास पुन्हा एकदा खाजगी हॉटेल्स देखील ताब्यात घेण्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.