coronavirus: अनलॉक वनदरम्यान कल्याणमधील मेोहल्ल्यात शंभर टक्के लॉकडाऊनची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 04:14 PM2020-06-08T16:14:43+5:302020-06-08T16:15:36+5:30
गोविंदवाडी, मच्छीमार्केट, मौलवी कंपाऊंड परिसर 10 दिवसासाठी शंभर टक्के बंद करा अशी मागणी मुस्लिम समाजाचे नेते शरफूद्दीन कर्ते यांनी केली आहे.
कल्याण-कल्याण पश्चिमेतील मुस्लिम बहुल वस्तीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. मुस्लिम बहुल वस्तीतील गोविंदवाडी, मच्छीमार्केट, मौलवी कंपाऊंड परिसर 10 दिवसासाठी शंभर टक्के बंद करा अशी मागणी मुस्लिम समाजाचे नेते शरफूद्दीन कर्ते यांनी केली आहे.
यासंदर्भात कर्ते यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची आज दुपारी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपमहापौर जावेद जवणो उपस्थित होते. मुस्लीम बहुल वस्ती ही झोपडपट्टी आहे. त्याठिकाणी दहा बाय दहाच्या खोलीत दाटीवाटीने लोक वास्तव्य करुन आहेत. त्यांच्याकडून सोशल डिस्टसिंगचे पालन केले जात नाही. तसेच महापालिकेने खरेदी विक्रीसाठी जो कालावधी शिथील करुन दिली आहे. त्या कालावधीत वस्तीतील लोक जास्त प्रमाणात घरातून बाहेर निघतात. लॉकडाऊनचे योग्य प्रकारे पालन केले गेले नाही. त्याचबरोबर मुस्लीम मोहल्ल्यात कोळीवाडा आहे. मच्छी खरेदीसाठी हे लोक बाहेर जातात. ते पुन्हा वस्तीत येतात. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढतो आहे. कोरोना संशयीताना कोरोना चाचणी करुन घ्या असे सांगितले तरी त्यांच्याकडून चाचणी करण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. सरकारने अनलॉक वन जाहिर केल्यानंतर हळूहळू दुकाने उघडण्यात येत आहे. बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. मुस्लिम वस्तीतील लोक हे सगळीकडे फिरतील. सगळ्य़ांमध्ये मिसळतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे. मुस्लीम वस्ती शंभर टक्के दहा दिवस बंद ठेवली नाही तर कल्याण शहराचा नायनाट होईल अशी भिती कर्ते यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात आयुक्तांनी सांगितले की आहे की, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. आरोग्य पथक परिसरात फिरत आहे. नागरीकांनी स्वत:हून सहकार्य करावे. तपासणी करावी. त्यानंतर याविषयी निर्णय घेता येईल.