Coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हॉटेल-बार बंदची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:28 AM2020-03-18T01:28:47+5:302020-03-18T01:29:05+5:30
शहरांत ठिकठिकाणी सुरू असलेल्या बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढती आहे. त्यांच्या या संपर्कामुळे हा संसर्ग होण्याची संभाव्यता लक्षात घेत ते बंद करण्याची मागणी होत आहे.
ठाणे : मुंबईस लागून असलेल्या ठाणे शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यावरील उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनासह डॉक्टरांकडून सर्वपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरांत ठिकठिकाणी सुरू असलेल्या बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या
वाढती आहे. त्यांच्या या संपर्कामुळे हा संसर्ग होण्याची संभाव्यता लक्षात घेत ते बंद करण्याची मागणी होत आहे.
सामाजिक जबाबदारीचे भान राखून गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने आधीच केले आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील कार्यक्रम थांबवले आहेत. गुढीपाडव्याच्या मिरवणुकाही आयोजकांनी रद्द केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर मंदिरांमधील भक्तांची गर्दी टाळण्यासाठी संबंधित व्यवस्थापकांनी मंदिरेदेखील बंद ठेवण्याचे नियोजन केले. या उपाययोजनांच्या दृष्टीने बार, रेस्टॉरंट, हॉटेलमधील ग्राहकांची गर्दी रोखण्यासाठी ते काही दिवस बंद करण्याच्या दृष्टीने सामाजिक संघटना पुढे येण्याच्या प्रयत्नात आहेत.
कोरोनाचा संसर्ग झालेल्याची संख्या सातवर गेली आहे. डॉक्टरांच्या निगराणीतील या रुग्णांना मासिक आधार देऊन या संकटातून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कोरोनाच्या या संकटाला राष्टÑीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापनाचा कायदा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लागू केला आहे.
दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन
नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात सिव्हिल रुग्णालयातील परिचारिका नागरिकांच्या दूरध्वनींना उत्तरे देत आहेत. आतापर्यंत चार दूरध्वनी येऊन त्यांनी त्यांच्या इमारतीमध्ये परदेशातून आलेल्या मात्र दरवाजा बंद करून राहत असलेल्यांची माहिती दिल्याचे परिचारिकांनी सांगितले. तर उपाययोजनेच्या मार्गदर्शनासाठी जिल्ह्याभरातून फोन येत असल्याचेही सांगितले जात आहे. बार रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ते बंद करण्याची मागणी जोर धरत आहे, यावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हॉटेल, बार, रेस्टॉरंट बंद केल्यास सकाळी घर सोडलेल्यांच्या खाण्यापिण्याचे वांधे होतील; पण ठिकठिकाणच्या रेस्टॉरंटमधील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने ट्रॉन्सपोर्ट बंद करावे लागेल. यामुळे नागरिक अन्य शहरात जाणे टाळतील आणि रेस्टॉरंटमधील गर्दी कमी होईल.