घरात बसून कंटाळलेल्या मुलांसाठी 'धम्माल मस्ती'ची ऑनलाईन शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 02:58 PM2020-04-04T14:58:49+5:302020-04-04T15:01:26+5:30
कोरोनामुळे सर्व बच्चेकंपनी घरातच असल्याने एरव्ही हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुट्टीचा मुलांना आता कंटाळा येऊ लागला आहे.
कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमूळे सध्या लहान काय आणि मोठे काय सर्वांचेच आयुष्य बदलून गेलं आहे. मोठी माणसं घरातील काही सामान आणण्यासाठी तरी बाहेर पडू शकतात पण लहानग्यांचे तर ते पण नाही. गेल्या आठवड्याभरापासून फक्त घर एके घर. ना खेळणं, ना बागडणे, ना शाळा आणि ना मित्र-मैत्रिणी. त्यामूळे लहान मुलांच्या मानसिक स्थितीवरही निश्चितच परिणाम होत असेल. हा विचार डोळ्यासमोर ठेऊन कल्याणच्या बालक मंदिर प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने राबवलेला ऑनलाइन शाळेचा उपक्रम मुलांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
कोरोनामुळे सर्व बच्चेकंपनी घरातच असल्याने एरव्ही हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुट्टीचा मुलांना आता कंटाळा येऊ लागला आहे. मात्र मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सुट्टी आवश्यक असली तरी घरात बसून कंटाळलेल्या मुलांसाठी बालक मंदिरच्या विलास लिखार यांनी सुरू केलेली ऑनलाईन शाळा मुलांचा हा कंटाळा दूर करताना दिसतेय.
विलास लिखार यांनी झूम ऍपच्या माध्यमातून 'ऑनलाईन' शाळेतील दुसऱ्या इयत्तेतील मुलांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. छानपैकी धम्माल-मस्ती आणि गप्पा गोष्टींच्या माध्यमातून मुलांचा ऑनलाईन अभ्यासही सुरू आहे. या उपक्रमाला मुलांबरोबरच त्यांचे पालकही उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे लिखार यांनी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे घरात बसून कंटाळलेली मुले आणि त्यांचा कंटाळा काढून काढून थकलेले पालक हे दोघेही या ऑनलाईन शाळेवर बेहद खुश आहेत.