Coronavirus: मध्यवर्ती रुग्णालयात मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांचे ‘कामबंद’; अधीक्षकाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 02:41 AM2020-05-06T02:41:00+5:302020-05-06T02:41:10+5:30
सोमवारी रुग्णालयाच्या प्रांगणात मोटारसायकल उभी केली होती. दुपारी १.३० च्या दरम्यान कोरोना रुग्णालयाचा अहवाल शासनाला पाठविण्यासाठी स्टॅम्प हवा असल्याने ते बाहेर जाण्यास निघाले
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयाचे सामाजिक अधीक्षक सतीश वाघ यांना सोमवारी करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी काहीकाळ कामबंद आंदोलन केले. याप्रकरणी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी पोलीस उपायुक्तांना पत्र पाठवून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.
वाघ यांनी सोमवारी रुग्णालयाच्या प्रांगणात मोटारसायकल उभी केली होती. दुपारी १.३० च्या दरम्यान कोरोना रुग्णालयाचा अहवाल शासनाला पाठविण्यासाठी स्टॅम्प हवा असल्याने ते बाहेर जाण्यास निघाले. तेव्हा साध्या वेषातील पोलिसांनी त्यांना मोटारसायकल काढण्यास मनाई केली. त्या वेळी त्यांनी स्टॅम्प आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी आपले काहीच न ऐकता मारहाण करीत फरफटत मध्यवर्ती रुग्णालयात नेल्याचे वाघ यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मारहाणीचा निषेध केला. तसेच डॉ. शिंदे यांनी पोलीस उपायुक्तांकडे कारवाईची विनंती केली.
वाघ यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाघ यांनी पोलीस उपायुक्त व मध्यवर्ती पोलिसांना निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकाराने मध्यवर्ती रुग्णालय विरुद्ध पोलीस असे चित्र शहरात निर्माण झाले आहे.
किरकोळ भांडण-सुरडकर
वाघ व पोलीस यांच्यात किरकोळ भांडण झाले, अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुरडकर यांनी देऊन अधिक चौकशी करण्याचे संकेत त्यांने दिले. वाघ यांच्या मारहाणीप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.