CoronaVirus News: मुंबईजवळच्या 'या' शहरानं करून दाखवलं! कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी १३० दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:42 AM2020-08-10T00:42:05+5:302020-08-10T06:26:04+5:30
परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश
भिवंडी : राज्यात कोरोना परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नसतानाही भिवंडीतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल १३० दिवसांवर पोहोचला आहे. शहरातील कोरोनाची परिस्थिती निवळण्यात प्रशासनासोबत नागरिक, पोलीस, सेवाभावी संस्था, खाजगी डॉक्टर संघटना या सर्वांचे प्रयत्न कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.
कोरोनाची परिस्थिती बिकट झाल्याने सुरुवातीला रुग्णांसाठी रुग्णालय व रुग्णवाहिका मिळण्यासाठी पावले उचलली गेली. नंतर, आयजीएम या पालिकेच्या कोविड रुग्णालयात आॅक्सिजन टँकची उभारणी करून सर्व बेड आॅक्सिजनलाइनने जोडले गेले, तर शहरातील दोन सांस्कृतिक सभागृहांत पालिकेच्या वतीने तब्बल २६० आॅक्सिजन बेडची व्यवस्था केली. शहरात सुरू केलेल्या ३० मोहल्ला क्लिनिक, शिक्षक, पालिका कर्मचारी यांच्या ४७८ पथकांकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात अनेक संशयित रुग्ण आढळल्यानंतर त्यांची तपासणी केली. त्यांच्या निकटवर्तीयांना आरोग्य विभागाने अलगीकरण केल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनास यश आले. सध्या शहरात कोविड रुग्णालयातील ९० टक्के बेड रिकामे असून शहरात ९०० आॅक्सिजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे, असे डॉ. आशिया यांनी सांगितले.
भिवंडीतील परिस्थिती आटोक्यात आणण्याबाबत मालेगाव पॅटर्न अथवा मालेगाव काढा यांचा सहभाग किती होता, असे विचारल्यावर आयुक्त म्हणाले की, कोरोनाला अटकाव केवळ प्रशासन करू शकत नाही. राज्य, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत असताना सर्वांचे सहकार्य मिळाले.
महापालिका कर्मचारी यांनी घेतलेली दिवसरात्र मेहनत या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून कोरोना परिस्थिती आटोक्यात आणली, असे त्यांनी सांगितले. खाजगी रुग्णालये आर्थिक पिळवणूक करत असल्याची राज्यात ओरड होत आहे. मात्र, आयुक्तांनी शहरातील सहा खाजगी कोविड रुग्णालयांतील रुग्णांकडून वसूल केलेल्या बिलाची चौकशी टास्क फोर्सतर्फे केली. संबंधित रुग्णालयांकडून खुलासा मागविल्यानंतर अनावश्यक असलेल्या बिलांचा परतावा संबंधित रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना देण्याबाबत कारवाई केली, असे डॉ. आशिया यांनी सांगितले.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के; मृत्युदरही सव्वादोन टक्क्यांपेक्षा कमी
शहरात कोरोना रुग्णांची संख्या सात हजार ११४ पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर, मृत्युुदर सव्वादोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र, चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असून लॉकडाऊन काळात वाढ झाली होती. त्याचा ताण आरोग्य सुविधेवर पडला होता. आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी उपाययोजना राबवत एक विशेष आराखडा तयार केला. त्यानुसार, काम केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले.
शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या सात हजार ११४ पेक्षा जास्त असून त्यापैकी सहा हजार ३७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, १५४ जणांचा मृत्यू झाला. तसेच ५८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी फक्त ७० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना सौम्य व अतिसौम्य स्वरूपाची लक्षणे
आहेत. तर, ८७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
ठाणे, कल्याण, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ आदी पालिकांपेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शहरात जास्त आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने आरोग्य विभागावरील ताण कमी झाला, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.