coronavirus : कार्यालयात पोहोचण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे द्राविडी प्राणायाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 12:28 PM2020-03-28T12:28:37+5:302020-03-28T12:42:31+5:30

विशेषतः मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ठाणे जिल्ह्यातून मुंबईत जाताना फरफट होत आहे.

coronavirus: Dravidian pranayama of government employees to reach the office | coronavirus : कार्यालयात पोहोचण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे द्राविडी प्राणायाम

coronavirus : कार्यालयात पोहोचण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे द्राविडी प्राणायाम

Next

- योगेश बिडवई

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉक डाऊननंतर मुंबईत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातून बेस्ट तसेच इतर एसटी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र ही सेवा त्यांच्यासाठी पुरेशी नसल्याचे चित्र आहे. कार्यालयात पोहोचण्यासाठी या कर्मचाऱ्यांना सर्कस करावी लागत आहे. 

विशेषतः मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ठाणे जिल्ह्यातून मुंबईत जाताना फरफट होत आहे. कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कल्याण बस स्थानकाबाहेर मुंबईत जाण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसेसची व्यवस्था आहे. मात्र शुक्रवारी 12 वाजता मुंबईकडे जाणाऱ्या कल्याणच्या मुख्य बस स्टॉपवर गोंधळ सुरू होता. नायर रुग्णालयाच्या काही महिला कर्मचाऱ्यांना घेऊन न जाता बस रवाना झाली होती. कल्याणच्या वेगवेगळ्या भागातून पायपीट करत कर्मचारी बस स्टॉपवर येतात. मात्र काहींनी बस भरलेली नसताना आधीच नेल्याचे या महिलांनी सांगितले. बस स्टॉपवरून के.ई.एम रुग्णालय, जे जे रुग्णालय, टाटा रुग्णालय आदी ठिकाणी परिचारिकांसह इतर कर्मचारी रोज जातात. मात्र त्यांची संख्या आणि उपलब्ध बसेस यांचे गणित व्यस्त आहे. बस चुकल्यास दुसऱ्या बसमध्येही त्यांना घेतले जात नाही. 

साडेबाराच्या दरम्यान मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचारी,  पोलीस कर्मचारी तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम संपवून घरी परतत होते. कल्याणला या बसमधील काही कर्मचारी उतरले. उर्वरीत कर्मचारी बदलापूरपर्यंतच्या मार्गावरील होते. या बसमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबलेले होते. 50 पेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये होते. त्यात काही उभे होते. एकीकडे गर्दी करू नका, असे सर्वसामान्यांना सांगितले जाते. मात्र कोरोनाच्या नियमांची सरकारी कर्मचाऱ्यांकडून पायमल्ली सुरू असल्याचे चित्र होते. या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली येथून कर्मचारी दररोज असेच अडचणींचा सामना करत मुंबईत कार्यालयात पोहोचतात आणि गर्दीत घरी येतात. 

वांद्रे, प्रतिक्षा नगर, सांताक्रुझ, वडाळा येथील आगाराच्या बस कल्याण, डोंबिवली परिसरात येतात. अनेकांना मुंबईत कार्यालयात पोहोचण्यासाठी दोन तीन वेळा बस बदलावी लागते. मात्र आम्ही अत्यावश्यक सेवेत असल्याने कामावर जाणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

दुपारी एक वाजता नायर रुग्णालयात पोहोचण्यासाठी 20-25 कर्मचारी एक वाजेच्या बसची वाट पाहत होते. मात्र दीड वाजेपर्यंत वडाळा आगाराची बस अालेली नव्हती. काहींना सलग 24 तासांची म्हणजे दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी तीनपर्यंत तर काहींना 12 तासांची ड्युटी असल्याचे नायर रुग्णालयाच्या कर्मचारी ज्योती कदम यांनी सांगितले. मात्र सुविधांचा अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आमची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा
कार्यालयाकडून आम्हाला हॅण्ड सॅनिटायझर, मास्क पुरविण्यात आले नसल्याचे अनेकांनी सांगितले. आमची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, असेही एका कर्मचाऱ्याने सांगितले. 

आम्हाला बसच्या ड्रायव्हर किंवा कंडक्टरचा मोबाईल नंबर दिलेला नाही. बसची वाट पाहण्यापलिकडे आम्हाला मार्ग नाही. कल्याणहून मुंबईत जाताना रोज अडचणी येतात. 

- गौस शेख, सुरक्षा कर्मचारी, नायर रूग्णालय, मुंबई

 

Web Title: coronavirus: Dravidian pranayama of government employees to reach the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.