coronavirus: देवदर्शनाला गेलेले कुटुंब लॉकडाउनमुळे अडकून पडले, राज्य सरकारला घातले साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 02:20 AM2020-05-13T02:20:28+5:302020-05-13T02:20:55+5:30
अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे.
अंबरनाथ : देवदर्शनासाठी गेलेले अंबरनाथमधील कुटुंब लॉकडाउनमुळे राजस्थानमध्ये अडकले आहे. या कुटुंबाला अंबरनाथमध्ये परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी मागणी होत आहे. अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे.
लॉकडाउनच्या काळात अजमेरला राहत असलेल्या ठिकाणी जेवणाचे हाल होत आहेत. याशिवाय आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध होत नाहीत, परत जाण्याविषयी विचारणा केल्यास कुणी धड उत्तर देत नाहीत. वैद्यकीय तपासणीसाठी गेलो तर योग्य सहकार्य मिळाले नाही. ज्याठिकाणी राहण्यास परवानगी मिळाली, त्याठिकाणी पाणी आणि वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आम्हाला लवकर अंबरनाथला नेण्याची व्यवस्था
करा, अशी मागणी भाट यांनी केली आहे.
ज्याप्रमाणे परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकारने प्रयत्न करून मायदेशी परत आणले, त्याचप्रमाणे अजमेरला अडकलेल्या भाट कुटुंबीयांना राज्य सरकारने अंबरनाथला आणावे, अशा मागणीचे टिष्ट्वट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी सांगितले.
२१ मार्चपासून अजमेरात अंबरनाथ येथील भाट कुटुंबीयांचे २२ मार्च रोजी अजमेरहून अंबरनाथला परतीच्या प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षणही झाले होते. मात्र, २१ मार्चला देशभरात संचारबंदी लागू झाली आणि तेव्हापासून आम्ही अजमेरलाच अडकून पडलो आहोत, असे करण भाट यांनी सांगितले.