coronavirus: वैऱ्याच्याही नशिबी अशी घालमेल येऊ नये, कोरोना रुग्णाचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 01:37 AM2020-07-10T01:37:23+5:302020-07-10T01:37:40+5:30
कोरोना झाल्यामुळे रुग्ण व कुटुंबाची ताटातूट व घालमेल कशी होते, याबाबतचा आलेला अनुभव कोरोनातून बरे झालेल्या डोंबिवलीतील एका ४८ वर्षीय रुग्णाने कथन केला.
- प्रशांत माने
डोंबिवली : कोरोना झाल्यामुळे रुग्ण व कुटुंबाची ताटातूट व घालमेल कशी होते, याबाबतचा आलेला अनुभव कोरोनातून बरे झालेल्या डोंबिवलीतील एका ४८ वर्षीय रुग्णाने कथन केला.
ते म्हणाले की, कोरोनाच्या प्रादुर्भावात गरिबांना मदतीचा हात देताना कोरोनाची लागण कशी झाली, हे कळलेच नाही. एक दिवस ताप आला. वयोवृद्ध आईलाही ताप आल्याने लागलीच दोघांनी कोरोनाची चाचणी केली. दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दोघेही तत्काळ उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल झालो. कोरोनाचा सामना करीत असताना घरातील अन्य व्यक्तींची विशेषकरून अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त असलेल्या वयोवृद्ध वडिलांची अधिक काळजी लागून राहिली होती. एरव्ही, आईच त्यांची सेवाशुश्रूषा करायची. परंतु, ती उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांची सेवा कोण करणार, असा यक्षप्रश्न उभा राहिला होता. परंतु, यात माझ्या पत्नीची मोलाची साथ लाभली आणि वडिलांच्या औषधोपचाराची जबाबदारी तिने लीलया पेलली.
दरम्यान, कोरोनाच्या चाचणीत ७५ वर्षीय वडील आणि १५ वर्षांचा मुलगा हे दोघेही पॉझिटिव्ह निघाले. सुदैवाने पत्नीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी आणि आई दोघेही रुग्णालयात होतोच. आता वडिलांना रुग्णालयात कसे दाखल करणार, याबाबत चिंता लागली होती. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह झाल्यावर सहसा त्याच्या संपर्कात आजूबाजूला राहणारे अन्य कोणीही येत नाही. मदत करणे दूरच असते. त्यात, आमचे जवळपास संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे अर्धांगवायूचा आजार असलेल्या वडिलांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करेपर्यंत माझ्या पत्नीला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. आम्ही दोघे ज्या रुग्णालयात दाखल होतो, त्याच ठिकाणी वडिलांना ठेवण्यात आले. आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. सुदैवाने आम्हाला डॉक्टर आणि परिचारिकांकडून चांगली वागणूक मिळाली.
परंतु, वयोवृद्ध आईवडिलांची अधिक चिंता वाटत होती. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने मुलाला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याच्याही तब्येतीची काळजी वाटत होती. पत्नी आणि मुलाच्या संपर्कासाठी मोबाइल हेच एक साधन होते.
डॉक्टर आणि परिचारिकांकडे आईवडिलांच्या तब्येतीची विचारपूस करत राहायचो. मी आणि आई उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी वडील दाखल झाले होते. दहा दिवस झाल्यानंतर आम्हाला दोघांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
...म्हणून वाढला मुक्काम
वडिलांना दाखल करून १० दिवस पूर्ण न झाल्याने त्यांना तेथेच राहावे लागणार होते.
त्यांच्या काळजीपोटी आम्ही दोघांनी दोन दिवसांचा मुक्काम वाढवला आणि एकत्रितच रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला.
कोरोनाची लागण झाल्यानंतर घेतलेला अनुभव वैºयाच्याही नशिबी येऊ नये, हीच प्रार्थना.