Coronavirus:...अन् समोर येऊ लागला कुटुंबीयांचा चेहरा; आयसीयूतून बाहेर पडण्याची होती तीव्र इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 11:42 PM2020-10-11T23:42:24+5:302020-10-11T23:42:35+5:30
Coronavirus News: व्यायाम, पोषक आहारावर भर, कोरोनाने जाताजाता अनेकांना दिले विविध आजारांचे ‘रिटर्न गिफ्ट’
अजित मांडके/पंकज पाटील
ठाणे : कोरोनामुळे मी २० दिवस रुग्णालयात होतो. आता पूर्ण बरा झालो असलो, तरी आजही मनात भीती कायम आहे, असे ठाण्यातील एका रुग्णाने सांगितले. थकवा, दम लागणे, कधीकधी श्वास घेण्यास त्रास होणे या समस्या आजही कायम आहेत. त्यासाठी आॅक्सिजनची पातळी कशी आहे, हे दिवसातून तीनवेळा मी तपासतो. शिवाय, खाण्यात पोषक आहार हा आता महत्त्वाचा भाग झाला आहे.
गेल्या महिन्यात मला कोरोनाची लागण झाली. माझे वय ५४ असल्याने या आजारातून मी बरा होईन का, ही सतत भीती होती. त्यात मला मधुमेहाचा त्रास. त्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझी आॅक्सिजन पातळी खाली गेली होती. डॉक्टरांनी शर्र्थीचे प्रयत्न केले आणि मी जवळजवळ २० दिवसांनंतर कोरोनामुक्त झालो. वाढदिवसाला जसे रिटर्न गिफ्ट दिले जाते, तसाच काहीसा प्रकार कोरोनानंतर झाला आहे. कोरोनाने जाताजाता मला इतर आजारांचे रिटर्न गिफ्ट दिले आहे. आॅक्सिजन पातळी खाली गेली असल्याने ती सावरण्यासाठी आता रोज प्राणायाम व योगा करतो.
सकाळ, दुपार आणि संध्याकाळ रोज ऑक्सिजनची पातळी तपासतो. आजही कोरोनाची भीती माझ्या मनातून काही केल्या कमी झालेली नाही. चालताना दम लागतो, थकवा येतो. अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी केली, तर लगेच चक्कर आल्यासारखे होऊन थकवा येतो. त्यातही उपचाराच्या काळात तब्बल नऊ किलो वजन कमी झाल्याने अशक्तपणा आला आहे. तो घालविण्यासाठी माझ्या आहाराकडे पत्नी लक्ष देत असून समतोल आहार आणि वजन कसे वाढविता येईल, यावर भर देत आहे.
कोरोनानंतर असे का झाले, असे डॉक्टरांना विचारले तर त्यांनी तुम्हाला फायब्रोसिस झाल्याचे त्यांनी सांगितले. आता हा काय नवीन प्रकार आहे, तो आपल्यालाच का झाला, याचाही विचार मनात सुरू होता. कोरोनाच्या काळात जास्त त्रास झाल्याने फुफ्फुसाला सूज येऊन ते सुकते. यामुळेच हा त्रास होतो, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे किमान दीड महिना तरी काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
पुरेशी झोप घेणे याकडे कल
कोरोनामुळे जीवन जगण्याच्या शैलीतही बदल झाला आहे. पूर्वी पुरेशी झोप घेतली नाही, तरी चालत होते. परंतु, आता पुरेशी झोप कशी मिळेल, याकडे माझा जास्त कल असतो. सकाळी उठून हलका व्यायाम, समतोल आहार, गरम पाणी पिणे, तेलकट-तिखट खाणे टाळणे आदींवर भर देतो. बाहेरचे खाणे पूर्ण बंद केले आहे. पथ्ये पाळली जात आहेत. वारंवार आरोग्याची तपासणी करीत आहे. आता मानसिक संतुलनही बिघडले असून मनात सतत हा आजार आपल्याला पुन्हा तर होणार नाही ना? याची धास्ती वाटते. त्यामुळे शक्यतो बाहेर जाण्याचे टाळतो.
आयसीयूतून बाहेर पडण्याची होती तीव्र इच्छा
अंबरनाथ : कोरोनाचा प्रभाव वाढत असताना साहजिकच मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीला विशेष काळजी घेण्याची गरज सुरुवातीपासून व्यक्त होत होती. त्यामुळे मीही योग्य काळजी घेऊनच आपले नियमित काम करीत होतो. तरीही, कोरोनाने आपल्याला गाठले आणि मृत्यूशी लढा सुरू झाला. अशावेळी कुटुंबासह मित्रांनी मोठा आधार दिला. मात्र, असे असले तरी आयसीयूमध्ये उपचार घेत असताना त्या वातावरणातून कधी बाहेर पडणार, याची हुरहूर कायम लागून राहिली होती, असे अंबरनाथमध्ये राहणारे राजेश खलाशी यांनी सांगितले.
राजेश यांना मधुमेहाचा त्रास असल्याने कोरोनापासून वाचण्यासाठी ते घरच्या घरी उपाय करीत होते. त्यातच, अचानक ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरु केले. मात्र, ज्या वेळेस श्वसनाचा त्रास सुरू झाला, त्यावेळेस मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ऑक्सिजन पातळी थेट ८५ पर्यंत आल्याने एका खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लागलीच मुंबईच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल झालो. त्या ठिकाणी आयसीयू कक्षात उपचार घेत असताना तीन ते चार दिवसांत आपली प्रकृती ठीक होईल, अशी अपेक्षा मनात होती. मात्र, जसजसे दिवस पुढे सरकत होते, तसतशी परिस्थिती बिघडत गेली. अखेर, व्हेंटिलेटरचा आधार घेण्याची वेळ आली. त्यामुळे आपले काही खरे नाही, अशी भीती मनात निर्माण झाली. मात्र, नशीब बलवत्तर आणि डॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच मला जीवदान मिळाल्याची प्रतिक्रि या राजेश यांनी व्यक्त केली.
१३ ते १४ दिवस आयसीयू कक्षात काढल्यानंतर त्या कोंडलेल्या वातावरणातून बाहेर कधी पडतो, याची हुरहूर मनाला होती. परिस्थिती सुधारत आहे की बिघडत आहे, याची कल्पना मी स्वत: करत होतो. प्रत्येकवेळी नजर ऑक्सिजन पातळीच्या मॉनिटरवर जात होती. ती परिस्थिती, ते वातावरण, तो प्रत्येक क्षण भयानक होता. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाल्यावर आयसीयू कक्षातून बाहेर निघताच आपल्याला जीवदान मिळाले, याची शाश्वती मिळाली, असे खलाशी यांनी सांगितले.
ऑक्सिजन कमीजास्त
आयसीयूमध्ये असताना वेळ पुढे सरकत नव्हती. बेडवरून उठू दिले जात नसल्याने सर्वकाही बेडवरच करावे लागत होते, असे राजेश खलाशी यांनी सांगितले. आॅक्सिजनची पातळी वारंवार वरखाली होत असल्याने मनाची भीती वाढत होती. मात्र डॉक्टर, कर्मचारी धीर देत असल्याने आपण बरे होऊ, अशी आशाही वाटत होती, असे खलाशी यांनी सांगितले.
...अन् समोर येऊ लागला कुटुंबीयांचा चेहरा
अंबरनाथ : मला जूनमध्ये कोरोना झाला. सुरुवातीला सौम्य वाटणाऱ्या कोरोनाने माझ्या फुफ्फुसात कधी संसर्ग झाला, हे कळण्यापूर्वीच माझी रवानगी आयसीयूत करण्यात आली. त्यानंतर मी अक्षरश: देवाच्या दारात जाऊन परत आले. ही वेळ कुणावरही येऊ नये, अगदी शत्रूवरही... अशी भावना व्यक्त केली आहे, कोरोनाशी यशस्वी लढा देणाºया नीलिमा करमरकर यांनी.
कोरोनाशी लढताना करमरकर यांची परिस्थिती भयानक झाली होती. ज्या काळात कोरोनाविषयी भीती निर्माण होती, त्या काळातच कोरोनाची लागण झाल्याने अर्धा जीव गेल्यासारखी परिस्थिती होती. उपचार घेताना रुग्णालयातील परिस्थितीचे अवलोकन त्यांनी केले. त्या म्हणाल्या की, जूनमध्ये मला ताप आला. डॉक्टरांकडून गोळ्या घेतल्या. तरीही, दोन दिवस ताप राहिल्यामुळे मुलाने माझी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांनी ही चाचणी पॉझिटिव्ह आली आणि कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. तोवर माझा ताप उतरला असला, तरी मधुमेह असल्याने मला तातडीने डोंबिवलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे सुरु वातीचे चार दिवस त्रास झाला नाही. मात्र, त्यानंतर अचानक चक्कर येऊन पडले. त्यानंतर, माझी रवानगी थेट आयसीयूमध्ये झाली. माझी आॅक्सिजन पातळी कमी झाली होती. मात्र, आयसीयूत गेल्यानंतर माझी प्रकृती दिवसेंदिवस अधिकाधिक ढासळत गेली. रोज आजूबाजूचा एखादा बेड रिकामा होत होता. त्यामुळे आपलीही हीच अवस्था होऊ नये. प्लास्टिकमध्ये गुंडाळून जावे लागू नये, या विचाराने परिवाराचे चेहरे रोज डोळ्यांसमोर येत होते.
कोरोनाच्या रुग्णाला कुणालाही भेटता येत नाही. घरचे लोक दवाखान्यात सोडायला येतात. नंतर थेट घरी न्यायला किंवा पोहोचवायलाच नातेवाईक येतात. अशात, आजूबाजूला सतत पीपीई किटमधील लोक पाहून धीर सुटत चालला होता. आधीच मधुमेह, फुफ्फुसात ८० टक्क्यांपेक्षाही जास्त इन्फेक्शन झाल्याने इंजेक्शनेही देऊन झाली. तरीही साध्या आॅक्सिजनवरून हाय-फ्लो आॅक्सिजन, मग बायपॅप आणि शेवटी व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली. त्यामुळे दुसरीकडे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. १४ दिवसांच्या मुक्कामानंतर मुलुंडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. हायफ्लो आॅक्सिजनवर एका रुग्णालयातून दुसरीकडे हलवणे हे सोपे काम नाही. रस्त्यात आॅक्सिजन संपल्याने आॅक्सिजन पातळी ४५ ते ५० वर होती. अखेर, त्या रुग्णालयात गेल्यानंतर चाचणी निगेटिव्ह आली आणि मला जनरल आयसीयूत शिफ्ट केले.
जीव कासावीस झाला होता
जवळपास १६ ते १७ दिवसांनी साध्या कपड्यातले पीपीई किट न घातलेले लोक आजूबाजूला पाहूनच मी अर्धी बरी झाले; अर्थात मानसिकरीत्या. त्यानंतर, डॉक्टरांनी मला १५ दिवसांनी स्वत:च्या पायावर चालत घरी पाठवले. मात्र, या काळात मी जो काही अनुभव घेतला, माझा जीव घरी जाण्यासाठी जो काही कासावीस झाला होता आणि प्लास्टिकची जी धास्ती होती, तो अनुभव एखाद्या शत्रूच्याही वाट्याला येऊ नये, हीच प्रार्थना.