Coronavirus: लढा कोरोनाशी! भिवंडीमध्ये अॅक्शन प्लान तयार; दररोज होणार ३०० मोफत चाचण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 12:51 AM2020-06-30T00:51:50+5:302020-06-30T00:52:04+5:30
नागरिकांना हलका ताप व कोविडची लक्षणे जाणवल्यास त्वरित मनपाच्या फिव्हर क्लिनिक अथवा कोविड तपासणी केंद्रात यावे, असे आवाहनही डॉ. आसिया यांनी केले.
भिवंडी : भिवंडीत कोरोनाने थैमान घातले असून रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. यावर भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आसिया यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अॅक्शन प्लान तयार केला असून काही दिवसांपासून त्याची सुरूही झाली. याअंतर्गत आता दररोज ३०० मोफत चाचण्या करण्यात येणार असून आठवडाभरात दोन हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.
शहरात अॅम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असताना आयुक्तांनी सुरुवातीलाच प्रभागनिहाय वैद्यकीय अधिकारी अॅम्ब्युलन्स व अॅम्ब्युलन्सचालक उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ५० ते १५० पर्यंत होणाºया चाचण्यांचे प्रमाण दुप्पट होणार आहे. खासगी लॅबकडून कोविड तपासणीसाठी सुरू असलेल्या आर्थिक पिळवणुकीलाही चाप बसणार आहे. तसेच आर्थिक पिळवणूक करणाºया खासगी रुग्णालयांसह लॅबवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त डॉ. आसिया यांनी दिला आहे.
शहरातील रईस हायस्कूल येथे ४०० बेडचे कोविड सेंटर मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. याच ठिकाणी कोविडची मोफत तपासणी होणार आहे. तसेच शहरातील चाचा नेहरू हायस्कूलमध्ये १५० बेडचे कोविड केंद्र , खुदाबक्ष हॉल येथे १२० बेडचे आणि ओसवाल हॉल येथे १०० बेडचे कोविड केंद्र आठवडाभरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. आसिया यांनी सोमवारी दिली.
ताप येत असल्यास उपचार घ्या!
नागरिकांना हलका ताप व कोविडची लक्षणे जाणवल्यास त्वरित मनपाच्या फिव्हर क्लिनिक अथवा कोविड तपासणी केंद्रात यावे, असे आवाहनही डॉ. आसिया यांनी केले.