CoronaVirus News: अपुऱ्या मनुष्यबळामुळे कोरोनाविरोधातील लढा अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 01:06 AM2020-06-14T01:06:48+5:302020-06-14T01:06:54+5:30
ठामपाने जास्तीचा पगार देऊनही डॉक्टरांनी फिरवली पाठ, कोविड रुग्णालय प्रतीक्षेतच
- अजित मांडके
ठाणे : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी महापालिका विविध प्रकारच्या उपाययोजना करीत आहे. बाळकूम येथे एक हजार खाटांचे रुग्णालयही तयार झाले आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदींसह इतर स्टाफचे पुरेसे मनुष्यबळच पालिकेला मिळालेले नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. त्यातही आयसीयूचे कामकाज पाहणारे एक्स्पर्टही मिळाला नसल्याने या रुग्णालयाचा शुभारंभही लांबणीवर पडला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
भविष्यात रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊ न बाळकुम येथील ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे कोरोना रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दोनच आठवड्यांत हे रुग्णालय ठाणेकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. या रुग्णालयात कळवा रुग्णालयातील आर्थोपेडिक सर्जन, आणखी एका डॉक्टरची नियुक्ती केली आहे. तसेच या रुग्णालयाचे कामकाज नवीन सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विश्वनाथ केळकर पाहत आहेत. या रुग्णालयासाठी महापालिकेने काही दिवसांपूर्वी भरतीप्रक्रिया सुरू केली होती. महापालिकेद्वारे लेक्चरर, ज्यु. रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद आदींसाठी ५०० जणांची भरती केली जाणार होती.
महापालिका प्रशासन एमबीबीएस आणि एमडी डॉक्टरांसाठी दोन लाख ४० हजार रुपये मासिक मानधन देणार आहे. तसेच डॉक्टर यावेत यासाठी आता वाढीव मानधनाचा पर्यायही पालिकेने पुढे आणला आहे. तरीही २५ टक्के डॉक्टरांनीच यामध्ये सहभाग दाखवला आहे. आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी डॉक्टरांशिवाय इतर कोणीही आलेले दिसले नाही.
नर्स पदासाठी १९५ जणांची भरती केली जाणार होती, त्यातील ५० टक्के नर्सने हजेरी लावली आहे. सिस्टर इंचार्ज, प्रयोगशाळा विशेषज्ञ, औषध निर्माण अधिकारी आदींच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यांची संख्याही नगण्य आहे. वॉर्डबॉयने तर या भरतीकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता जो हाऊस किपिंगचे काम करणार आहे, त्याच्याकडूनच वॉर्डबॉयचे काम करून घेतले जाणार आहे. तसेच बीएचएमएस डॉक्टरांच्या खांद्यावर रुग्णालयाची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उपचार करतानाही त्यांना आधी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
आयसीयू तंत्रज्ञाच्या शोधात पालिका
एक हजार खाटांच्या या रुग्णालयात १०० बेड हे आयसीयूचे ठेवले आहेत. हे आयसीयू चालवण्यासाठी आयसीयू तंत्रज्ञाची गरज असते. मात्र, अद्याप आयसीयू तंत्रज्ञ मिळालेला नाही. त्यामुळे आता कोरोनावर मात कशी करायची, असा पेच महापालिका प्रशासनाला पडला आहे.
...म्हणून लांबला शुभारंभ
रुग्णालयाचा शुभारंभ १२ जूनला निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार त्याचे नियोजनही करण्यात आले होते. डॉक्टरांची टीमही यासाठी सज्ज ठेवण्यात आली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने या रुग्णालयाचा शुभारंभ लांबला असल्याचेही बोलले जात आहे. परंतु त्यातही अपुºया मनुष्यबळाआभावीच त्यांनी हा शुभारंभाकडे पाठ फिरविल्याचेही बोलले जात आहे.
डॉक्टरांनी पाठ फिरविली असली तरीही सध्या या रुग्णालयासाठी पुरेसे मनुष्यबळ आहे. भरतीप्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकूणच मनुष्यबळ कमी असले तरी आम्ही रुग्णालय लवकरात लवकर सुरू करू.
- विश्वनाथ केळकर, उपायुक्त, ठाणे महापालिका