Coronavirus: केडीएमसीचा लढा कोरोनाशी: जम्बो सेटअप, प्रिव्हेन्शन प्लान राबविण्यावर अधिक भर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 12:32 AM2020-07-04T00:32:43+5:302020-07-04T00:33:28+5:30
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची माहिती; वाढीव खाटांमुळे रुग्णांवर करता येणार उपचार
मुरलीधर भवार
कल्याण : केडीएमसी हद्दीतील वाढते कोरोनाचे रुग्ण रोखण्यासाठी जम्बो सेटअप आणि प्रिव्हेन्शन प्लान राबविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’ला दिली.
केडीएमसी हद्दीत १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. सध्या जुलैमध्ये रुग्णांची संख्या साडेसात हजारांवर गेली आहे. मनपा हद्दीतील १८ लाखांची लोकसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा अत्यंत तोकडी होती. दोन रुग्णालये, १५ आरोग्य केंदे्र आणि तेथील अपुरे कर्मचारी, अशा परिस्थितीत कोरोनाशी मुकाबला करण्याचे मोठे आव्हान सूर्यवंशी यांच्यापुढे होते. त्यावर मात कशी केली, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘शहरात २५ ते ५० खाटांची खाजगी रुग्णालये होती. प्रथम आयएमए डॉक्टर संघटनेला विश्वासात घेत त्यांच्याकडून स्टाफची मदत घेतली. डॉक्टर व नर्सची भरती सुरू केली. मुलाखतीला आलेल्या १२० पैकी ४० नर्स तर, ३४ डॉक्टरांपैकी पाच जण सेवेत दाखल झाले.
स्टाफच्या कमतरतेमुळे कोविड हेल्थ सेंटर आणि रुग्णालये चालविण्यासाठी मुंबईतील एजन्सीची मदत घेतली जाणार आहे. आतापर्यंत २० खाजगी रुग्णालये अधिग्रहित करून रुग्णांना सेवा देत आहोत. रुग्णांच्या उपचारासाठी जम्बो सेटअप उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.’
रुग्णांच्या वाढीचा उच्चांक १५ जुलैपर्यंत राहणार आहे. जुलैच्या अखेरपर्यंत रुग्णसंख्या कमी होऊ शकते. प्रिव्हेन्शन प्लान त्यासाठी तयार आहे. हा प्लान काय असेल, तर हायरिस्क रुग्ण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी महापालिका स्टाफ, शिक्षकांची मदत घेतली जात आहे. अनेक संस्थांचे स्वयंसेवकही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. ते तापसदृश रुग्ण शोधणार असून, रुग्णांना लगेच क्वारंटाइन केले जाईल. त्यांची टेस्ट केली जाईल. ती निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडले जाईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
मनपा हद्दीत एका पॉझिटिव्ह रुग्णामागे २५ जणांना क्वारंटाइन केले जात आहे. हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्यांना सात दिवस इमारतीबाहेर पडू दिले जाणार नाही. कोरोना चाचणीसाठी लोक बाहेर पडतात. त्यामुळे सर्व लॅबची मीटिंग घेऊन हायरिस्क असलेल्यांची यादी महापालिका लॅबला कळवेल. लॅबने चार दिवसांनी घरी जाऊन स्वॅब कलेक्शन करावे. एका लॅबमध्ये दिवसाला १०० टेस्ट होत असतील, तर त्यात ३५ ते ४० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो. मनपा हद्दीत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १०० जणांमागे ३० ते ४० टक्के आहे. नागरिकांनी स्वत:हून चाचणीसाठी पुढे यावे. क्वारंटाइनला घाबरून जाऊ नये. टाटा आमंत्राबरोबर अन्य ठिकाणाही क्वारंटाइनची सुविधा आहे. तसेच प्रत्येक प्रभागात हे सेंटर उभारले जाणार आहे. तेथील काउंटरमार्फत घरचे जेवण क्वारंटाइन व्यक्तीला दिले जाईल, असे आयुक्त म्हणाले.
अशा आहेत जम्बो सेटअपमधील सुविधा
‘जम्बो सेटअपमध्ये डोंबिवली क्रीडासंकुलातील बंदिस्त सभागृहात ३० आयसीयू आणि १५० आॅक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. तसेच टेनिस कोर्टमध्ये ७५ आॅक्सिजन बेड, बीओटी तत्त्वावरील इमारतीत ३०० बेड, डोंबिवली जिमखान्यात ११० आयसीयू बेड, कल्याणच्या फडके मैदान आर्ट गॅलरीत ४०० आॅक्सिजन बेड व १२० आयसीयू बेड, वसंत व्हॅली येथे १२ आयसीयू बेड व ६३ आॅक्सिजनचे बेड उभारण्यात येत आहेत. हे सगळे मिळून एक हजार बेडचा जम्बो सेटअप उभा राहील. जुलैअखेरपर्यंत तेथे रुग्णांना उपचार मिळू लागतील. शहाड पुलानजीक साई निर्वाणा येथे ६०० बेड, इंदिरानगरातील बीएसयूपी इमारतीत २०० बेडची सुविधा तसेच प्रत्येक प्रभागात ३०० बेडचे क्वारंटाइन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली, तरी बेडची कमतरता भासणार नाही’, असे सूर्यवंशी म्हणाले.