Coronavirus: अंबरनाथमध्ये पाच हजार कोविड चाचण्या मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:46 AM2020-07-03T02:46:16+5:302020-07-03T02:46:28+5:30
शहरात अनेक खाजगी लॅब जास्त दर आकारून नागरिकांच्या चाचण्या करत आहेत. त्यामुळे पालिकेनेच आता लॅबला परवानगी दिल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही.
अंबरनाथ : अंबरनाथ पालिका क्षेत्रात एका लॅबला कोविड टेस्ट करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्या मोबल्यात अंबरनाथ पालिकेने सुचविलेल्या ५ हजार रुग्णांच्या चाचण्या मोफत कराव्या लागणार आहे. या लॅबचा अहवाल २४ तासात येत असल्याने त्याचा फायदा गंभीर रुणांच्या चाचणीसाठी होणार आहे.
अंबरनाथ पालिकेने पूर्व भागातील वडवली शाळेत कोविड चाचणी केंद्र उभारण्यास परवानगी दिली आहे. या सेंटरमध्ये लवकर अहवाल येत असल्याने ज्यांची प्रकृती खराब आहे त्यांची चाचणी लागलीच करून त्याचा अहवाल आल्यावर त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे सोपे जाणार आहे.
शहरात अनेक खाजगी लॅब जास्त दर आकारून नागरिकांच्या चाचण्या करत आहेत. त्यामुळे पालिकेनेच आता लॅबला परवानगी दिल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही. शहरातील डॉक्टरांकडे उपचारासाठी जाणाऱ्यांनाही चाचण्या बंधनकारक असल्याने इतर रुग्णालाही या लॅबची मदत होणार आहे. परवानगी देत असताना अंबरनाथ पालिकेने सुचविलेल्या नागरिकांना मोफत चाचण्या करून देणे बंधनकारक केले आहे. पालिकेच्या या निर्णयाचे अंबरनाथमधील नागरिकांनी स्वागत केले आहे.
पालिकेचे रिपोर्ट येण्यासाठी तीन दिवस लागतात. त्या दरम्यान एखाद्या रुग्णाला उपचाराची गरज असल्यास त्याला वेळेवर उपचार मिळत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे जलद गतीने रिपोर्ट देणाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी