Coronavirus: नगरसेवकाने खडसावताच रुग्णाला मिळाले उपचार; चार तास प्रेमाने केली विनंती, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 12:47 AM2020-06-30T00:47:25+5:302020-06-30T00:47:37+5:30
चार तास प्रेमाने विनंती करूनही जे शक्य झाले नाही, ते काम अपशब्द वापरल्यावर झाले याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
पंकज पाटील
अंबरनाथ : शहरात वैद्यकीय व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. लक्षण असलेल्या रुग्णांवर उपचारांची छाया रुग्णालयाकडे जबाबदारी असतानाही तेथे उपचार दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. रविवारी एका महिला रुग्णाला त्रास होत असतानाही तिला छाया रुग्णालयाच्या आवारात सहा तास उपचारांसाठी ताटकळावे लागले. उपचार मिळत नसल्याने नगरसेवकांनी रुग्णालय प्रशासनाला सुरुवातील विनंती करून नंतर धारेवर धरल्याने अखेर त्या महिलेला दाखल करण्यात आले.
अंबरनाथ न्यू कॉलनी परिसरात राहणारी महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये गेली होती. मात्र तेथे तिला उपचारांसाठी दाखल न केल्याने ती महिला दुपारी २ वाजता छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली. तिला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी तिला लागलीच पुढे जाण्याचा सल्ला दिला. मात्र पुढे गेल्यावरही तिला दाखल करून न घेतल्याने ती उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातून पुन्हा छाया रुग्णालयात आली. रुग्णालय प्रशासनाने तिला रात्री ८ वाजता ठाण्याच्या मध्यवर्ती रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत महिलेची प्रकृती खालावल्यामुळे तिला त्वरित उपचारांची आवश्यकता होती.
चार तास प्रेमाने करत होते विनंती
शहरात किंवा उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार मिळावे, यासाठी नगरसेवक मिलिंद पाटील हे प्रयत्न करीत होते. मात्र, कुठेच उपचारांसाठी दाखल केले जात नसल्याने त्यांनी छाया रुग्णालय प्रशासनालाच विनंती केली. तरीही, प्रशासन ऐकत नसल्याने पाटील यांचा तोल जाऊ न त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत अपशब्द वापरले. चार तास प्रेमाने विनंती करूनही जे शक्य झाले नाही, ते काम अपशब्द वापरल्यावर झाले, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.