CoronaVirus : उल्हानगरचे शासकीय प्रसूती रुग्णालयाचे रूपांतर कोरोना रुग्णालयात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 03:05 PM2020-04-05T15:05:00+5:302020-04-05T15:18:47+5:30
Coronavirus : उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील शासकीय प्रसूती रुग्णालय कोरोना COVID-19 रूग्णालयात रूपांतरित करण्यात येणार असल्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला.
उल्हासनगर : शहरातील शासकीय प्रस्तुतीगृह रुग्णालयाचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख व पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांनी शनिवारी रुग्णालयाची पाहणी केली असून कोरोना रोगाच्या तपासणीसाठी आवश्यक swab sample घेण्याची सोय मध्यवर्ती रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील शासकीय प्रसूती रुग्णालय कोरोना COVID-19 रूग्णालयात रूपांतरित करण्यात येणार असल्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला. दोन ते तीन दिवसांमध्ये रुग्णालयाचे कामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून ते घोषित केले जाणार असून स्वाब सैमपल (swab sample) घेण्याची सोय शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयातील कोरोना COVID-19 रुग्णालयात करण्यात येणार आहे. शहरातील डॉक्टरांनी स्वतः च्या रुग्णालयात कोरोना रोगाच्या रुग्णांवर उपचार करणे अभिप्रेत नाही. तसेच त्यांनी कोरोना सदृश्य लक्षणे त्यां च्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये आढळल्यास अशा रुग्णाचे स्वाब नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवणे आवश्यक राहणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
याबाबतची सविस्तर माहिती तात्काळ महानगरपालिकेच्या मदत केंद्रावर देणे संबंधित डॉक्टरांवर बंधनकारक राहील. असा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्काबाबतचा सविस्तर तपशील संबंधित डॉक्टरांनी आपल्याकडे नमूद करून ठेवावी. तसेच खात्री झालेल्या कोरोना रुग्णावर केवळ कोरोना केविड-19 वर उपचार करण्यासाठी स्थापन केलेल्या कोरोना COVID-19 रुग्णालयातच उपाययोजना केल्या जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.