Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी सरकार करणार व्हेंटिलेटर, मॉनिटरसह एचआयव्ही किट खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 01:01 AM2020-03-22T01:01:07+5:302020-03-22T01:01:37+5:30
- नारायण जाधव ठाणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढू लागली आहे. त्यातच ...
- नारायण जाधव
ठाणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढू लागली आहे. त्यातच मुंबईसारख्या राजधानीच्या शहरांत व्हेंटिलेटरसह इतर वैद्यकीय उपकरणे तोकडी असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आरोग्य विभागाने तातडीने एचआयव्ही किट, व्हेंटिलेटर, डिस्पोजल मास्क आणि मल्टिपॅरा मॉनिटरसह वाढीव वैद्यकीय खाटा खरेदी करणार आहे.
यावर पहिल्या टप्प्यात सहा कोटी दोन लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्यास आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. यातून आयसीयू बेडसारखे ४६ बेड वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्व शासकीय निकष वापरून अत्यावश्यक बाब म्हणून कोरोनाला रोखण्यासाठी खर्च करण्यास मंजुरी दिली. मात्र, आता आरोग्य विभागाने दिलेल्या मंजुरीनुसार ११,५०० एचआयव्ही किट, ३४००० डिस्पोजल मास्क,४६ वैद्यकीय खाटांसह ४६ व्हेंटिलेटर, ४६ मल्टिपॅरा मॉनिटर खरेदी करण्यात येणार आहेत. यातील व्हेंटिलेटरची किंमत ११ लाख १३ हजार १५३ रुपये, मल्टिपॅरा मॉनिटरची किंमत एक लाख २६ हजार ३०२, एचआयव्ही किटची किंमत १६०, वैद्यकीय खाटेची किंमत १७ हजार ८५७ आणि मास्कची किंमत १७.३३ रुपये गृहीत धरण्यात आली आहे.