Coronavirus: बाप्पांना घडवणारे हातही संकटात; मूर्तिकाराने दिला मजुरांना आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 08:58 PM2020-04-24T20:58:52+5:302020-04-24T20:59:04+5:30
यंदा कोरोनामुळे त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
- विशाल हळदे
ठाणे : लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत दिवस कसे काढायचे, ही वेळ कशी ढकलायची, असा प्रश्न असंख्य गोरगरिबांसमोर आ वासून उभा आहे. ठाण्यातील माजिवडा गावातील मूर्तिकार सुरेश मोरे हेदेखील त्याच गोरगरिबांच्या पंक्तीतील एक. गेल्या 45 वर्षांपासून ते गणपती मूर्ती बनवण्याचा पिढीजात कारखाना सांभाळत आहेत. यंदा कोरोनामुळे त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
सहा वर्षापूर्वी सुरेश मोरे यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. पत्नीच्या पश्चात मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आली. एकीकडे मूर्ती बनवण्याचा कारखाना आणि दुसरीकडे संसाराचा गाडा, अशी दुहेरी सर्कस ते सांभाळत आहेत. 12 वर्षापूर्वी मोरे यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली. अशा परिस्थितीत बाप्पांना आकार देण्याचे त्यांचे काम अविरत सुरूच आहे.
आठ मजुरांना हाताशी धरून मोरे यांनी कारखाना सुरू ठेवला. परंतु कोरोनाच्या वादळामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यांचे मजूर कळवा येथील वाघोबानगरमध्ये वास्तव्यास आहेत. ते आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळीचा भार आता मोरे यांच्यावरच आहे. एवढ्या वर्षापासून ते माझ्याकडेच काम करीत आहेत. काही उत्तर प्रदेश तर काही बिहारचे आहेत. संपूर्ण देशावरच संकट आले आहे. या संकटात मी त्यांची साथ देणे, हे माझे कर्तव्य आहे. ज्यावेळी माझी शस्त्रक्रिया झाली, त्यावेळी याच मजुरांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मला सांभाळले. आता माझ्याकडून होईल तेवढी मदत मी त्यांना करत आहे, अशा भावना मोरे यांनी व्यक्त केल्या.
मोरे हे मजुरांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठीही मदत करत आहेत. मूर्ती बनवण्याचा व्यवसाय मार्चपासून सुरू होतो, तो अगदी ऑगस्टमध्ये विसर्जन होईर्पयत. त्यानंतर देवी बनवण्यास सुरुवात होते. सध्या आम्हाला लागणारी इतर सामुग्री आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे काम बंद पडले आहे. मी सध्या रबरचा एक फार्मा तयार करीत आहे. तोही जेवढे रबर आहे, त्यात जेवढा होईल तेवढाच. सरकार उत्तम काम करत आहे. सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मत मोरे यांनी लोकमतजवळ व्यक्त केले.