Coronavirus: ठाण्यात गरम पाण्याची वानवा; खोलीची करावी लागते सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:16 AM2020-07-01T05:16:17+5:302020-07-01T05:16:34+5:30
क्वारंटाइन सेंटरमधील सुविधांबाबत समाधानी
अजित मांडके
ठाणे : कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्या घरातील किंवा आजूबाजूच्या लोकांना ठाणे महापालिकेच्या वतीने भार्इंदरपाडा, होरायझन स्कूल तसेच हाजुरी येथे ठेवले जात आहे. येथील असुविधांबाबत गेले काही दिवस ओरड सुरू होती. परंतु, भार्इंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये वेळच्या वेळी नाश्ता, जेवण, चहा आदींसह इतर सुविधा मिळत असल्याचे येथील नागरिकांनीच सांगितले आहे.
होरायझन स्कूलमध्ये एकाच ठिकाणी अनेकांना ठेवले जात असल्याने येथील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तिन्ही क्वारंटाइन सेंटरला गरम पाणी दिले जात नसले तरी फळे दिली जात असल्याचे येथील नागरिक सांगतात. ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला आठ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना या तीन केंद्रांच्या ठिकाणी ठेवले जात असून आजमितीला चार हजारांहून अधिक नागरिक दाखल आहेत.
भार्इंदरपाडा येथील केंद्रात प्रत्येक व्यक्तीला एक ‘वन आर के’फ्लॅट दिला आहे. त्या ठिकाणी पलंग, गादी, अंगावर चादर, पिण्यासाठी बिसलेरी पाणी, टॉवेल, टुथब्रश आदींचा पुरवठा केला जात आहे. सुरुवातीला काही दिवस येथे साफसफाई होत नसल्याची ओरड होती. तसेच जेवणाची आबाळ होत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. परंतु, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून संबंधितांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर परिस्थिती बदलली. दिवसातून एक वेळेस डॉक्टर तपासणीसाठी येतात, औषधे वेळच्या वेळी मिळतात. दिवसातून दोन वेळा संपूर्ण इमारत सॅनिटाइज केली जाते. परंतु, हे संशयित ज्या खोलीत राहत आहेत तेथील सफाई त्यांनाच करावी लागत आहे. चहा, नाश्ता, दोनवेळा जेवण वेळेवर मिळत असून रोजच्या जेवणात नवा मेन्यू असल्याने घरच्यासारखे वातावरण वाटत असल्याचे वास्तव्य करणारे सांगतात.
मात्र, होरायझनमध्ये एकाच खोलीत अनेकांना ठेवले जात असल्याने, येथे गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही दिवसांपूर्वी क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवणात पावभाजी दिली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. येथील बाथरूममधील अस्वच्छतेबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, आता येथील परिस्थिती काही प्रमाणात सुधारल्याचे सांगतात. हाजुरीमधील सेंटरमध्ये बऱ्यापैकी सुविधा असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, या तिन्ही केंद्रांच्या ठिकाणी गरम पाणी मिळत नाही, अशी तक्रार आहे.
मी आणि माझी वयस्कर आई आम्ही दोघेही एकाच वेळी येथे दाखल झालो. मागील पाच दिवस येथे राहात आहोत, परंतु आमचे कोणत्याही प्रकारचे हाल या केंद्रात झालेले नाहीत. उलट वेळच्या वेळी सर्व मिळत आहे, बाटलीबंद पाणी, डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे. अगदी घरच्यासारखी काळजी घेतली जात आहे. - एम. राकेश, नागरिक
भार्इंदरपाडा, होरायझन आणि हाजुरी येथील क्वारंटाइन केंद्रांत चार हजारांहून अधिक नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आम्ही आमच्या परीने येथील नागरिकांना पौष्टिकआहार देत आहोत. डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली जात आहे. पिण्यासाठी बाटलीबंद पाणी देत आहोत. दिवसातून दोनवेळा सफासफाई केली जात आहे. - अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठामपा
मी या केंद्रात तीन दिवस होतो. माझे येथे अजिबात हाल झाले नाहीत. मस्त वातावरण, वेळच्या वेळी खायला मिळत होते. त्यात खिडकी उघडली की समोर खाडीचे सुंदर दृश्य यामुळे फ्रेश झाल्यासारखे वाटत होते. - विनोद यादव, नागरिक