coronavirus: श्वास अडकल्यावर रुग्ण ओटीपी कसा सांगणार? नारायण पवार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 12:17 AM2020-07-09T00:17:32+5:302020-07-09T00:17:48+5:30
कोरोना रुग्णांना महापालिका ओला-उबर टॅक्सीसेवेचे प्रवासी समजते का? दुर्दैवाने एखाद्या रुग्णाचा श्वास अडकल्यावर तो चालकाला ओटीपी कसा सांगेल
ठाणे : महापालिकेने सुरू केलेल्या आॅनलाइन बेड अलोकेशन सिस्टीममध्ये रुग्णवाहिकेत बसल्यावर कोरोना रुग्णाला मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक चालकाला द्यायचा आहे. कोरोना रुग्णांना महापालिका ओला-उबर टॅक्सीसेवेचे प्रवासी समजते का? दुर्दैवाने एखाद्या रुग्णाचा श्वास अडकल्यावर तो चालकाला ओटीपी कसा सांगेल, असा सवाल भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी बुधवारी केला.
महापालिकेने सुरू केलेल्या वेबसाइटवर रुग्णालयात बेड रिक्त दिसतो. मात्र, तेथे फोन केल्यावर रुग्णांना थेट बेड दिला जात नाही. त्यासाठी प्रभागस्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले जाते. त्यामुळे वेबसाइटचा काहीही उपयोग झालेला नाही.
आता आॅनलाइन बेड अलोकेशन पद्धतीत फॉर्मवर माहिती भरून द्यायची आहे. कोरोना संसर्ग झाल्यावर रुग्णापासून नातेवाईक दूर होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: एखाद्या गरीब वा वृद्ध रुग्णाला इंटरनेट वा वेबसाइटची माहिती नसल्याने त्याने लॉकडाऊनच्या काळात 'सायबर कॅफे' शोधायचा का, असा सवाल त्यांनी केला. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता कॉलसेंटरच्या माध्यमातून एका फोनने रुग्णाला मदत व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
वेबसाइटचा खर्च प्रशासनाने जाहीर करावा
ग्लोबल हब येथील रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा उभारण्याचा महापालिकेचा दावा आहे. मात्र, याठिकाणी मृतदेह बदलण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. आता महापालिकेने बेड मिळण्यासाठी वेबसाइट सुरू केली. कोरोनाकाळात वेबसाइट व आॅनलाइन पद्धतीने जनतेला माहिती देण्यासाठी किती खर्च झाला, ते प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.