Coronavirus: मला कोरोना होणार हे माहिती होते, परंतु मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलो - स्वप्नील शेजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:48 PM2020-10-11T23:48:14+5:302020-10-11T23:49:00+5:30

पहिल्या दिवसापासून त्यांना ऑक्सिजन लावला होता. छातीत कफ भरला होता. तसेच न्यूमोनिया झाला होता. भरीसभर कोरोनाही झाला. उपचार घेताना त्यांच्या मनात अनेक वाईट विचार डोकावत होते.

Coronavirus: I knew it was going to be Corona, but came out of the jaws of death - near the dream | Coronavirus: मला कोरोना होणार हे माहिती होते, परंतु मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलो - स्वप्नील शेजवळ

Coronavirus: मला कोरोना होणार हे माहिती होते, परंतु मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलो - स्वप्नील शेजवळ

Next

मुरलीधर भवार

कल्याण : मला कोरोना झाला, तेव्हा मला सहा दिवस ऑक्सिजन लावला होता. त्यानंतरच मी बरा झालो. कोरोनावर मात करत मृत्यूच्या दाढेतून परत आलो. माझे काम सतत बाहेरचे असल्याने लोकांच्या संपर्कात येत होतो. कोरोनातून बरा झालो असलो, तरी मला पुन्हा होणार नाही, असे नाही. मला कोरोनाचा पूर्वानुभव असल्याने कोरोनाचे पूर्वीसारखे भय राहिलेले नाही. तरीही, योग्य ती काळजी घेत आहे, अशी माहिती स्वप्नील शेजवळ यांनी दिली. स्वप्नील हे छायाचित्रकार आहेत. त्यांच्या घरी सात वर्षांचा मुलगा थॅलेसिमिया या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे स्वप्नील घरी गेल्यावर कपडे स्वत: धुतात. दिवसातून तीन वेळा अंघोळ करतात. जनमानसात जाताना अनेकांशी संपर्क येत असल्याने त्यांना कोरोना होणार, हे माहीत होते.

गेल्या महिन्यात वडिलांना कोरोना झाला. तेव्हा त्यांची सेवा करताना स्वप्नील यांनाही कोरोनाची लागण झाली. सगळ्यात आधी थंडी वाजायला लागली. त्यानंतर ताप आल्याने कोरोना झाल्याची शंकेची पाल मनात चुकचुकली. त्यांनी ही बाब त्यांच्या मित्रांना सांगितली असता त्यांच्या छातीचा सिटीस्कॅन करण्याचा सल्ला त्यांच्या मित्राने दिला. रिपोर्टनुसार छातीत कफ असल्याचे स्पष्ट दिसले. त्यांनी महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधला असता, त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला गेला. त्यांची अ‍ॅण्टिजेन चाचणी करण्यात आली. टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यांना डोंबिवलीतील कोविड रुग्णालयात दाखल केले.

पहिल्या दिवसापासून त्यांना ऑक्सिजन लावला होता. छातीत कफ भरला होता. तसेच न्यूमोनिया झाला होता. भरीसभर कोरोनाही झाला. उपचार घेताना त्यांच्या मनात अनेक वाईट विचार डोकावत होते. त्यांचे कुटुंब प्रचंड धास्तावले होते. त्यांचा भाऊ व आई, वडील चिंतेत होते. मात्र, स्वप्नील यांनी मला बरे व्हायचे आहे, असे स्वत:च्या मनाला बजावत स्वत:चा आत्मविश्वास ढळू दिला नाही. उपचारादरम्यान त्यांना बोलताही येत नव्हते. प्रचंड धाप लागत होती. डॉक्टर व नर्ससोबत हातवारे करूनच बोलत होते. उपचार सुरू असताना पाचव्या दिवशी त्यांचा ताप व खोकला कमी झाला. धापही कमी झाली. तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला. उपचारादरम्यान घरातील मंडळींशी ते कसेबसे व्हिडीओ कॉलिंगवर हातवारे करून संवाद साधत होते. त्यांचा भाऊ त्यांना जेवण घेऊन येत होता. तीन दिवस तर त्यांना जेवणच गेले नाही. त्यांनी कोरोनाविषयी माहिती वाचली. त्यात कोरोना रुग्णाने चांगला आहार घेतला पाहिजे, अशी माहिती वाचल्यावर तिसऱ्या दिवशी ते भरपूर जेवण घेऊ लागले. त्यात फळांचा समावेशही होता. त्यांचे वडील कोरोनातून बरे झाले होते. त्यामुळे मीही बरा होऊ शकतो, असा विश्वास होता.

कोरोनामुळे काही रुग्णांना फुफ्फुसाचा फायब्रोसिस झाला आहे. अशा रुग्णांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो. न्यूमोनिया किंवा कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाच्या उतींना इजा होते. त्यामुळे फुफ्फुसाचा विशिष्ट भाग खराब होऊ न ते आकुंचन पावते. परिणामी, हवा शुद्धीकरणाची प्रक्रिया बिघडून ऑक्सिजनपुरवठा कमी होऊ लागतो. रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांना त्रास जाणवत राहतो. कारण, फायब्रोसिस झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसाच्या त्या भागावर व्रण राहतो. त्यामुळे आजूबाजूचा भागही आक्रसून रुग्णांची आॅक्सिजनची पातळी सतत कमी होते. अशा रुग्णांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ऑक्सिजन देणे गरजेचे असते. काही रुग्ण हे या व्याधीतून तीन महिन्यांत बरे होतात; मात्र ज्यांना मोठ्या प्रमाणावर दमा आहे किंवा जुना आजार आहे, अशा रुग्णांना आयुष्यभरासाठी दिवसातून सातआठ तास ऑक्सिजन देणे आवश्यक असते. फायब्रोसिस झालेल्या रु ग्णांनी घरी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. - डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे, ठाणे ग्लोबल हॉस्पिटल
 

Web Title: Coronavirus: I knew it was going to be Corona, but came out of the jaws of death - near the dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.