Coronavirus:पैसे संपले.. सांगा पोटाची खळगी कशी भरायची?; परप्रांतीय मजुरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 01:19 AM2020-05-05T01:19:07+5:302020-05-05T06:52:41+5:30

गावी जाण्यासाठी आसुसलेल्या कामगारांच्या पोलीस ठाण्यांबाहेर रांगा

Coronavirus: I run out of money .. tell me how to fill my stomach ?; The question of foreign workers | Coronavirus:पैसे संपले.. सांगा पोटाची खळगी कशी भरायची?; परप्रांतीय मजुरांचा सवाल

Coronavirus:पैसे संपले.. सांगा पोटाची खळगी कशी भरायची?; परप्रांतीय मजुरांचा सवाल

Next

जितेंद्र कालेकर 
 

ठाणे : गाठीशी असलेले दहा हजार रु पये गेल्या ४0 दिवसांमध्ये संपले. आता पोटाची खळगी कशी भरायची, असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ उपस्थित केला. पोलीस आणि महापालिकेतील योग्य समन्वयाअभावी, तसेच योग्य माहिती न मिळाल्यामुळे मजुरांचे हाल होत आहेत.
माजीवडा भागात राहणारा श्रावणकुमार (३0) हा मूळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूरचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो टाईल्स बसविण्याचे काम नेताराम या ठेकेदाराकडे करतो. गावी आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. जवळ दहा हजार रु पये होते. तेही आतापर्यंतच्या जेवणासाठी संपले. कोणीतरी अन्नदान करतो. पण त्यांच्या देण्याच्या वेळेचा भरवसा नाही. मग भूकेची आग कशी विझवणार, हा प्रश्न रोजच असतो. त्यासाठीच गावी जायचे आहे. पण त्यासाठीही डॉक्टरांना २५0 ते ३00 रु पये मोजावे लागतायेत. पोलीस ठाणे, डॉक्टर आणि पुन्हा नगरसेवकाकडे फेऱ्या माराव्या लागताहेत. योग्य माहितीही कुठे मिळत नाही. जीव अगदी मुठीत आला आहे.
हरीश चव्हाण (२२, रा. माजीवडा, ठाणे) हाही टाईल्सचा कारागिर आहे. त्याचीही अशीच अवस्था असल्याचे त्याने सांगितले. सॅनिटायझरने हात धुणे सोडा, रोजच्या जगण्यासाठीच पैसे नाहीत. प्रत्येक गोष्टीची समस्या आहे. मग इथे राहण्यापेक्षा गावी जाणार आहे. पोलीस ठाण्यात अर्ज देण्याची, पुन्हा डॉक्टरकडे जाण्याची रांग मोठी असल्याने दोन दिवसांपासून फेºया मारतोय. आता करायचे काय? पाणी पिऊन भूक भागवतोय, असेही त्याने सांगितले.

गावी जाण्यासाठीचा अर्ज दुकानांमधून ३0 रु पयांना मिळतोय. अन्य एका टोकनसाठी २0 रु पये मोजावे लागतायेत. संकट काळात अशी लूटमार व्हायला नको, अशीही अपेक्षा त्याने व्यक्त केली.

वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, बाहेरगावी जाणाºयाने तो कंटेनमेंट झोनमधील रहिवासी नसल्याचे नगरसेवक किंवा प्रभाग अधिकाºयाचे प्रमाणपत्र आणावे. वैद्यकीय तपासणीचे नोंदणीकृत डॉक्टरकडून प्रमाणपत्रही गरजेचे आहे. शिवाय, तो कोणत्या गाडीने, कधी आणि किती जणांसोबत जाणार, याचाही तपशील त्याने अर्जात नमूद करावा. सध्या तरी रेल्वेची सुविधा नाही. त्याने खासगी वाहन करणे अपेक्षित आहे. अर्जासाठी त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. एकही परिपूर्ण अर्ज अद्याप प्राप्त झाला नसल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Coronavirus: I run out of money .. tell me how to fill my stomach ?; The question of foreign workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.