Coronavirus: काम करायचे नसल्यास लिहून द्या! केडीएमसीकडून तक्रार न ऐकता कर्मचाऱ्यांना दमदाटी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:24 AM2020-05-04T00:24:52+5:302020-05-04T00:25:47+5:30
रुग्णालयातील चालक, मदतनिसांची व्यथा
मुरलीधर भवार
कल्याण: कोरोनाची मुकाबला करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. या रुग्णालयात दिवसरात्र रुग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्या चालक आणि मदतनीस यांच्या तक्रारींकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यांची मागणी पूर्ण करण्याऐवजी काम करणार नसाल तर लेखी द्या, असा दम अधिकारी देत आहेत. त्यामुळे आपली व्यथा कोणाकडे मांडायची, असा सवाल उपस्थित केला असून त्यांनी त्यांच्या सहीनिशी एक निवेदन आयुक्तांना दिले आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णवाहिका आणि शववाहिनी या अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांवर काम करणारे चालक व मदतनीस मिळून २० जण आहेत. या चालक व मदतनिसांचा कोरोना रुग्ण आणि संशयिताशी थेट संपर्क येत आहे. रुग्णांना घरातून घेऊन येणे. त्यांना उचलून रुग्णालयात दाखल करणे हे काम हे चालक आणि मदतनीस करत आहेत. त्यांना आणखीन पाच मदतनीस वाढवून पाहिजेत. त्यांना मदतनीस वाढवून दिले जात नाहीत. तीन शिफ्टमध्ये हे चालक व मदतनीस काम करत आहेत. अशा परिस्थितीत आजदे गावातील एका इमारतीत रुग्ण आढळल्याने ती इमारत सील करण्यात आली. त्याच इमारतीत रुग्णवाहिकेवरील एक चालक राहत होता. त्याला होम क्वारंटाइन केल्याने एक चालक कमी आहे.
परिवहन उपक्रमातील काही चालक पुरवल्यास २० जणांवरील ताण कमी होऊ शकतो. २४ मार्चला लॉकडाउन जाहीर झाल्यापासून शास्त्रीनगर हे कोरोना रुग्णालय जाहीर केले गेले. तेव्हापासून आजपर्यंत या २० जणांची कोरोना चाचणी केलेली नाही. या विविध मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांना काम करायचे नाही तर लिहून द्या असा दम भरला जात आहे. या २० जणांनी आता आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. आयुक्त याप्रकरणी काय दखल घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पेट्रोल खर्च, राहण्याची सोय करण्याची मागणी
वीस जणांपैकी पाच जणच कल्याण-डोंबिवलीत राहतात. उर्वरित १४ जण हे आसनगाव, बदलापूर, टिटवाळा, ठाणे भागातून स्वत:च्या दुचाकीने येतात. परिवहन बसची सुविधा असली तरी त्या वेळेवर नाहीत. त्यामुळे स्वखर्चाने कर्तव्य बजावणाऱ्यांना पेट्रोल खर्च मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यांना घरी जावे लागत असून त्यांची डोंबिवलीत राहण्याची व्यवस्था करावी.