Coronavirus : प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ करून प्रवासी संख्या रोखणे अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:41 AM2020-03-18T01:41:00+5:302020-03-18T01:41:38+5:30

ठाणे रेल्वे स्थानकावर दररोज जेमतेम १९०० प्लॅटफॉर्म तिकिटे विकली जातात, तर अडीच लाख प्रवासी प्रवास करीत असलेल्या कल्याण रेल्वेस्थानकावर केवळ ११०० प्लॅटफॉर्म तिकिटे दररोज विकली जातात.

Coronavirus: Impossible to stop passenger numbers by increasing platform tickets | Coronavirus : प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ करून प्रवासी संख्या रोखणे अशक्य

Coronavirus : प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ करून प्रवासी संख्या रोखणे अशक्य

Next

- पंकज रोडेकर
ठाणे : रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांची संख्या कमी करण्याकरिता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर दहा रुपयांवरून ५० रुपये करण्याचा निर्णय फसवा असून, यामुळे प्रवाशांची गर्दी कितपत कमी होईल, याबाबत साशंकता आहे. कारण दररोज सुमारे सात लाख प्रवासी प्रवास करीत असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकावर दररोज जेमतेम १९०० प्लॅटफॉर्म तिकिटे विकली जातात, तर अडीच लाख प्रवासी प्रवास करीत असलेल्या कल्याण रेल्वेस्थानकावर केवळ ११०० प्लॅटफॉर्म तिकिटे दररोज विकली जातात.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्लॅटफॉर्म तिकीट दर दहा रुपयांवरून थेट ५० रुपये केल्याने रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होईल, या भाबड्या समजुतीने रेल्वेने हा निर्णय घेतला असला तरी बहुतांश रेल्वे स्थानकात तिकीट-पासाची कठोर तपासणी होत नसल्याने अनेकदा कुणीही प्लॅटफॉर्म तिकीट काढत नाहीत. अनेक जण रेल्वेतून विनातिकीट प्रवास करतात, तर केवळ नातलगाला सोडायला आल्यावर रांगेत उभे राहून प्लॅटफॉर्म तिकीट काढतील, ही अपेक्षा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बाळगून ही दरवाढ करणे, हे म्हणजे वेड्यांच्या नंदनवनात वावरण्यासारखे असल्याचे मत प्रवासी संघटनांचे आहे.
ठाणे रेल्वेस्थानकातून मध्य आणि ट्रान्स हार्बर (वाशी-पनवेल) मार्गावर तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या अंदाजे ७८२ अप-डाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेल दरम्यान सुमारे २८२ अप-डाउन लोकल तसेच जवळपास ८० अप आणि ७० डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. ठाणे स्थानकात दररोज ७५ ते ९० हजार लोकल तिकिटांची विक्री होते. तिकीटधारक, पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे प्रवासी, असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी ये-जा करतात. त्यापैकी नातेवाइकांना सोडायला आलेले किंवा कामानिमित्त रेल्वे फलाटावर ये-जा करण्यासाठी दहा रुपये खर्चून प्लॅटफॉर्म तिकीट काढणारे सुमारे १९०० प्रवासी आहेत.
बहुतांश नोकरदार मंडळी पास काढत असली, तरी ठाण्यात थांबा असलेल्या बाहेरगावच्या गाड्यांनी जाणाºया प्रवाशांना सोडायला येणारे नातलग व आप्तेष्ट यांनी प्लॅटफॉर्म तिकीट काढणे अपेक्षित आहे. मात्र, फारसे कुणी असे तिकीट काढत नाही. शिवाय, ज्या फलाटांवर बाहेरगावाकडील गाड्या येतात त्यावरून जलद लोकल जात व येत असल्याने पासधारक कोण व नातलगांना सोडायला आलेला प्लॅटफॉर्म तिकीट काढणे अपेक्षित असलेला प्रवासी कोण, यावर फारसे कुणी लक्ष देत नाही.
कल्याण रेल्वेस्थानकात दररोज १६० बाहेरगावाकडील गाड्या येतात व जातात. तेथे केवळ ११०० प्लॅटफॉर्म तिकिटे विकली जातात. कल्याण रेल्वेस्थानकातून दररोज अडीच लाख प्रवासी प्रवास करतात, तर डोंबिवली रेल्वेस्थानकातून दररोज साडेचार लाख प्रवासी प्रवास करतात. अनेक डोंबिवलीकर बाहेरगावाकडील गाडी पकडण्याकरिता किंवा परगावी निघालेल्या नातलगांना सोडण्याकरिता कल्याण स्थानकात जातात. मात्र, प्लॅटफॉर्म तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक चार, पाच व सहावर बाहेरगावाकडील गाड्यांसोबत लोकल गाड्यांची वाहतूक होत असल्याने तेथेही प्लॅटफॉर्म तिकीट न काढणाºयांवर अंकुश ठेवणे कठीण आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी करण्याकरिता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवणे हा पर्याय असू शकत नाही, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.

रेल्वे तिकीट जास्त स्वस्त
प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ५० रुपये मोजण्याऐवजी दहा रुपयांचे लोकलच्या प्रवासाचे किमान अंतराचे तिकीट काढून प्रवासी फलाटावर जातील. अनेकदा प्लॅटफॉर्म तिकीट, रेल्वेचे तिकीट किंवा पास खिशात नसतानाही पकडले न गेलेले फुकटे तेवढीही काळजी न घेता तोंडाला मास्क गुंडाळून फिरतील, असे रेल्वे अधिकारीच खासगीत मान्य करीत आहेत.

Web Title: Coronavirus: Impossible to stop passenger numbers by increasing platform tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.