Coronavirus: उल्हासनगरमधील घटना; पालिका कर्मचाऱ्याचा हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 01:39 AM2020-07-04T01:39:14+5:302020-07-04T01:39:30+5:30
उल्हासनगरमधील १५ पेक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी गायकवाड यांचा बुधवारी मृत्यू झाला.
उल्हासनगर : महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील करनिरीक्षक परशुराम गायकवाड यांचा बुधवारी कोरोनाने मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला असून कामगार संघटनेने विमा कवच व भरपाई देण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
उल्हासनगरमधील १५ पेक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी गायकवाड यांचा बुधवारी मृत्यू झाला. यापूर्वीही कंत्राटी वाहनचालकाचा मृत्यू झाला. गायकवाड हे अंबरनाथ येथे राहायला होते. कोरोना झाल्याचे कळल्यावर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा तब्येत बिघडल्याने या रुग्णालयाने आम्हाला कुठलीही कल्पना न देता परस्पर मध्यवर्ती रुग्णालयात पाठविल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. आम्ही सातत्याने रुग्णाच्या संपर्कात होतो. मात्र ज्यावेळेस संपर्क झाला नाही तेव्हा आम्ही खासगी रुग्णालयात गेलो. तेव्हा तुमच्या रुग्णाला मध्यवर्ती रुग्णालयात हलवले असल्याचे सांगितल्याचे कुटुंबाने नमूद केले. मध्यवर्ती रुग्णालयाने गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविले. पण त्या रुग्णालयाने त्यांना परत उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात भरती केले.