coronavirus: कल्याण-डोंबिवलीत वाढले रुग्ण : दररोज रखडतात ४०० जणांचे कोरोनाचे अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:14 AM2020-07-09T01:14:00+5:302020-07-09T01:14:29+5:30
कोरोना चाचण्या करताना कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असल्याने अत्यंत काळजीपूर्वक चाचण्या करणे गरजेचे असल्याने विलंब लागत असल्याचे सांगण्यात आले. अनेक लॅबकडे तपासणी कर्मचा-यांची कमतरता आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या चाचण्या करणाऱ्या या दोन्ही शहरांकरिता केवळ सहा लॅब आहेत. कोरोना चाचण्या करताना कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असल्याने अत्यंत काळजीपूर्वक चाचण्या करणे गरजेचे असल्याने विलंब लागत असल्याचे सांगण्यात आले. अनेक लॅबकडे तपासणी कर्मचा-यांची कमतरता आहे. स्वॅब कलेक्शन सेंटर वाढवणे व लॅबची संख्या वाढवणे हाच चाचण्या जलद गतीने होण्याचा मार्ग असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे. मनपा हद्दीत कोरोना चाचणीकरिता सहा सेंटर असून, त्यात स्वॅब कलेक्शन केल्यानंतर ते नमुने मुंबईतील लॅबकडे पाठवले जातात. तेथून रिपोर्ट आल्यावर तो रुग्ण व प्रशासनाला कळवला जातो. रिपोर्ट येण्यास किमान तीन ते चार दिवस लागतात. काही रुग्णांचा स्वॅब घेतला जातो, तेव्हा त्यांची प्रकृती बरी असली तरी प्रत्यक्ष पॉझिटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत खराब होते. त्यामुळेच काहींचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णांना दिली जाणारी औषधे मुख्य वितरक अथवा स्थानिक फार्मसी यांच्याकडून मिळण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनबरोबर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट असणे अनिवार्य आहे. बरेच डॉक्टर रुग्णांच्या नातलगांना औषधे आणायला सांगतात, पण रिपोर्ट प्राप्त झाला नसल्याने एकतर त्यांना औषधे मिळत नाहीत किंवा मग चढ्या दराने खरेदी करावी लागतात.
कल्याण-डोंबिवलीत दररोज सरासरी ७५० जणांची चाचणी केली जाते. त्यापैकी ३५० जणांचे रिपोर्ट प्राप्त होतात. त्यामुळे अनेकांचे रिपोर्ट येण्यास विलंब होतो. मेट्रोपोलीस मनपाने सुचवलेल्या रुग्णांची मोफत चाचणी करीत असून अशा १० हजार जणांची मोफत चाचणी ते करणार आहेत, अशी माहिती मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.
मेट्रोपोलीस लॅबची फ्रेंचाइजी चालविणाºया डॉ. रूपिंदर कौर म्हणाल्या की, मेट्रोपोलीस मोफत चाचण्या करणार असलेल्या १० हजार जणांपैकी आतापर्यंत जेमतेम दोन हजार जणांच्या टेस्ट केल्या आहेत. लॅब सेंटरमध्ये प्रत्यक्ष येऊन चाचणी करणाºया रुग्णाला २५०० रुपये आकारले जातात. जर, लॅबचे कर्मचारी घरी जाऊन रुग्णांची टेस्ट करणार असतील, तर २८०० रुपये आकारले जातात. घेतलेले स्वॅब निदान करण्याकरिता विद्याविहारला पाठवले जातात. कलेक्शन सेंटरमधून जे स्वॅब मुंबईतील सरकारी रुग्णालयात चाचणीकरिता पाठवले जातात, त्यांचे रिपोर्ट येण्यास विलंब होतो. मेट्रोपोलीसमधील कर्मचाºयांनाही टेस्ट करताना कोरोनाची लागण होत आहे. त्याठिकाणी स्टाफ कमी आहे. खाजगी लॅब कोरोनाची टेस्ट करीत असल्याने अन्य आजारांचे रुग्ण त्यांच्या आजारांच्या चाचण्या करण्यासाठी कोविड टेस्ट करणाºया लॅबकडे येत नाहीत. दिवसाला सहा सेंटरमधून ४०० टेस्ट केल्या जातात. परंतु, अडथळे दूर केल्याशिवाय रिपोर्ट लवकर मिळणे कठीण आहे. - संबंधित वृत्त/४
कोरोना टेस्टसाठी टोकन दिले जाते. होली क्रॉस कोविड रुग्णालयाबाहेर ५० टोकन स्वीकारले जातील, अशी पाटी लिहिली आहे. त्यामुळे टोकन न मिळालेल्या संशयित रुग्णांची वेटिंग लिस्ट वाढते. परिमाणी, रुग्ण व त्यांच्या परिवाराच्या धास्तीत अधिकची भर पडते.
केडीएमसीने गौरीपाडा येथे स्वत:ची कोरोना टेस्ट लॅब सुरू करण्याचे काम सुरू केले आहे. ही लॅब जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार होती. जुलैचा पहिला आठवडा संपला, तरी लॅब सुरू झालेली नाही. आणखी १० दिवस लॅब सुरू होण्यास लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सध्या असलेल्या सहा स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये आणखी दोनची वाढ करण्यात येणार आहे. खाजगी लॅबला आणखी टेस्ट सेंटर वाढविण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यांनी जागा सुचवल्या तर त्याठिकाणीही टेस्टिंग सेंटर सुरू केले जातील, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.