Coronavirus : ठाण्याच विलगीकरण कक्षाला वाढता विरोध, पालिकेची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 01:52 AM2020-03-19T01:52:00+5:302020-03-19T01:53:28+5:30
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल असते तर ही वेळ आली असती का, असा सवाल करण्यात येत आहे.
ठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी श्रीनगरच्या विलगीकरण कक्षाला विरोध झाल्यानंतर कासारवडवली येथील बीएसयूपीच्या इमारतीत तो सुरू करण्यासही स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. आता पोलीस बंदोबस्तात या इमारतीचा ताबा घेतला असला, तरी ते अद्याप सुरू झालेले नाही. मात्र, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल असते तर ही वेळ आली असती का, असा सवाल करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी शहरातील अशक्य असलेली रस्ता रुंदीकरण मोहीम पार पाडली आहे. त्यामुळे ते असते तर प्रत्येक प्रभाग समितीत विलगीकरण कक्ष सुरू झाले असते, असा सूर काढला जात आहे.
कासारवडवलीतील बीएसयूपीच्या इमारतीमध्ये हा कक्ष करण्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एक तर तो सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेतले नाही. दुसरीकडे ही इमारत कासारवडवली गावाला लागून असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याची शंका सिद्धार्थ ओवळेकर यांनी उपस्थित केली आहे. नागरिकांचा रोष बघून त्यांनी प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशीही चर्चा केल्यानंतर अखेर या ठिकाणी कक्ष सुरू करणार नसल्याचे पालिकेने तोंडी आश्वासन दिले. मात्र, लेखी आश्वासनासाठी गावकऱ्यांनी ठाणे महापालिकेला पत्र दिले आहे. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने कासारवडवली येथील विलगीकरण कक्षाचा ताबा महापालिकेने घेतला आहे. मात्र, स्थानिकांचा विरोध अद्यापही मावळलेला नाही.
यापूर्वी झाला नाही विरोध
यापूर्वी महापालिकेने कोणतीही मोहीम हाती घेतली, तरी तिला कधीही विरोध झाल्याचे दिसले नाही. रस्ता रुंदीकरणाची मोहीम असो किंवा फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचा प्रश्न असो, एकाही ठिकाणी कोणीच विरोध केला नाही. त्यामुळे आज ठाण्याचा चेहरामोहरा बदलला आहे. या मोहिमा यशस्वी झाल्या, त्या केवळ आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामुळेच. त्यामुळे आता पालिकेतील अधिकारीदेखील जयस्वाल यांची आज खरी गरज असल्याचे बोलत आहेत.