coronavirus: भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवेने नागपूरहून ठाण्यात २४ तासांच्या आत पोहोचवले व्हेंटिलेटर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 07:54 PM2020-06-11T19:54:23+5:302020-06-11T19:56:14+5:30
मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणा-या विशेष पार्सल गाड्या लक्षात घेता मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलने भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमता एकत्रित करून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा उपलब्ध करून दिली आहे.
ठाणे - मध्य रेल्वे आणि भारतीय टपाल सेवेची संयुक्त सेवा असलेली भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा ही सुरूवातीपासून शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी देण्यासाठी असून दोन व्हेंटिलेटर नागपूरहून मुंबईला नेण्यात आल्यामुळे आणखी एक विक्रम झाला आहे. यामध्ये डोर टू डोर सर्व्हिस २४ तासांच्या आत पूर्ण केली गेली.
नागपुरातील एक खाजगी संगणक कंपनी ज्यांनी, अथ ते इथपर्यंत असलेल्या म्हणजेच सुरूवातीपासून शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी देणा-या या सेवेचा ठाण्यातील प्रादेशिक मनोरूग्णालयात २ व्हेंटिलेटर्स पाठविण्यासाठी लाभ घेतला, त्यांना प्रभावित केले आणि ही सेवा खूप छान आहे असे त्यांना पटवून दिले गेले. कोरोना व्हायरस महासाथीच्या वेळी वेंटीलेटर्सचे महत्त्व लक्षात घेता हे पार्सल ८.६.२०२० रोजी बजाजनगर, नागपूर येथून घेण्यात आले आणि २४ तासात ठाणे येथील मनोरूग्णालयामध्ये ९.६.२०२० रोजी पोहोचविण्यात आले. यामध्ये १३४ किलो वजनाच्या ६ पॅकेट्सचा समावेश होता आणि उत्पन्न फारसे नव्हते, परंतु डोर टू डोअर सर्व्हिस ही एक गोष्ट असामान्य आणि विशेष बाब होती. श्री शेखर बालेकर, मुख्य पार्सल पर्यवेक्षक, नागपूर यांनी ही उपकरणे पाठविण्यासाठी पुढाकार घेतला.
कोविड-१९ लॉकडाऊनच्या सद्यस्थितीत, व्यक्ती आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना त्यांची आवश्यक आणि मोठ्या आकाराच्या वस्तू असलेला इतर माल पाठविणे कठीण जात आहे. मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणा-या विशेष पार्सल गाड्या लक्षात घेता मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलने भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमता एकत्रित करून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांमध्ये आणि दरम्यान उपलब्ध आहे. भारतीय टपाल सेवा ग्राहकांच्या आवारातून वस्तू घेते आणि मध्य रेल्वे आणि टपाल मेल मोटर सेवा द्वारे चालविल्या जाणा-या खास पार्सल गाड्यांच्या माध्यमातून गंतव्यस्थानावरील वस्तू पोहोचवित आहे.