CoronaVirus : उच्चभ्रू वस्तीत कोरोनाची लक्षणे लपवण्याच्या वृत्तीमुळे संसर्ग वाढतोय...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 04:47 PM2020-08-13T16:47:00+5:302020-08-13T16:51:19+5:30
ठाणे शहरात लॉकडाऊन सुरु असताना देखील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काही गृहनिर्माण संस्था मध्ये नेहेमीसारखे दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याची गंभीर बाब अनेकदा पुढे आली होती.
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांवर आले असून शहरात फक्त दहा टक्केच रुग्ण उरले असल्याचा महापालिकेचा दावा आहे. ठाणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या व्यापक चाचण्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. असे असले तरी ठाणे शहरात अजून देखील मोठ मोठ्या गृहनिर्माण संस्था मधून राहणाऱ्या सुशिक्षित ठाणेकर नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर ती लपवण्याकडे कल वाढत चालला आहे. यामुळे संसर्गाची व्याप्ती पुन्हा वाढण्याची शक्यता असून शहरात महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या मेहेनतीवर पाणी फिरणार आहे.
मागील काही दिवसात ठाणे शहरात कोरोनाने दाटीवाटीच्या चाळी, झोपडपट्ट्या सोडून गृहनिर्माण संस्थेमध्ये शिरकाव केला असून त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. मात्र जनलज्जे पोटी काही जण आपल्याला जाणवत असलेली लक्षणे लपवून चाचणी करण्यास नकार देत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आहे, समजल्यानंतर त्या कुटुंबावर अघोषित बहिष्कार टाकला जात असल्याने अनेक जण चाचणीस नकार देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
ठाणे शहरात लॉकडाऊन सुरु असताना देखील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काही गृहनिर्माण संस्था मध्ये नेहेमीसारखे दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याची गंभीर बाब अनेकदा पुढे आली होती. लॉकडाऊन काळात घराच्या टेरेसवर पार्ट्या करणे, मोकळ्या जागेत क्रिकेट खेळणे, बंदी असताना देखील मॉर्निंगवॉकला जाणे असे अनेक प्रकार या ठिकाणी सुरूच असल्याचे पाहायला मिळत होते. तक्रारी नंतर अनेक ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करून गुन्हे देखील दाखल केले आहेत. शहर टप्प्याटप्प्यात अनलॉक झाल्या नंतर याच परिसरात वर्दळ वाढल्याचे दिसून येते. विविध कारणामुळे अथवा व्यावसायिक कारणामुळे घरातून बाहेर पडण्याचे प्रमाण याच परिसरातून अधिक असल्याने या ठिकाणी बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आपणास कोरोना झाला तर सोसायटीतील इतर सभासदांचा आपल्या कुटुंबांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, अथवा आपल्या नातेवाइकांना ही गोष्ट समजली तर त्यांना काय वाटेल, ही भावना कोरोनाची लक्षणे लपवण्यामागे आढळून येत आहे. विशेष करून सुशिक्षित युवकांमध्ये घरीच राहून सोशल मीडियावरून सल्ले देणारी औषधे किंवा घरच्या घरी राहून करता येणाऱ्या उपाययोजना अंमलात आणून उपचार करण्याची मानसिकता वाढत चालली आहे. त्याच प्रमाणे सौम्य लक्षणे आढळून आल्या नंतर महापालिका रुग्णांना घरच्या घरी विलगीकरणात राहून उपचार करण्यास परवानगी देते. परंतु अशा रुग्णांना घराबाहेर पडण्यास मनाई असताना देखील काही जण नियमांची पर्वा न करता घरच्या बाहेर पडत असल्याने गृहनिर्माण संस्था मधील इतर सदस्यांना असलेला धोका वाढत चालला आहे.
दुकानदारांचा देखील चाचणी न करण्याकडे कल...
अनेक प्रभाग समितीमध्ये प्रभागातील दुकानदारांची रॅपिड अॅक्शन टेस्ट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असले, तरी काही दुकानदार मात्र अजून देखील टेस्ट करून घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी महापालिकेच्या रॅपिड अॅक्शन टेस्टवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून जास्तीत जास्त दुकानदारांना पॉझिटिव्ह ठरवून दुकाने बंद ठेवण्याचा पालिकेचा डाव असल्याचा अफवा, यामागे असल्याचे सांगितले जात आहे. तर अनेकांनी पालिकेने टेस्ट करण्याची मोहीम सुरु केल्यापासून आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.