Coronavirus : उल्हासनगरात एका महिलेला संसर्ग, कुटुंबासह सहकाऱ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:14 AM2020-03-20T06:14:45+5:302020-03-20T06:15:18+5:30
उल्हासनगरातील ४९ वर्षीय महिला पाच जणांसह दुबईला गेली होती. ४ मार्च रोजी परत आल्यानंतर सर्दी, खोकला, ताप आदी त्रास झाल्याने तिने ओळखीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने १७ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेतले असता, कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले.
उल्हासनगर : दुबईहून कुटुंबासह आलेल्या ४९ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले आहे. खबरदारी म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने या महिलेसोबत आलेल्या पाच जणांसह, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचाही शोध सुरू केला आहे. त्यापैकी काही जणांना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी पाठविल्याची माहिती आयुक्तांनी गुरुवारी दिली.
उल्हासनगरातील ४९ वर्षीय महिला पाच जणांसह दुबईला गेली होती. ४ मार्च रोजी परत आल्यानंतर सर्दी, खोकला, ताप आदी त्रास झाल्याने तिने ओळखीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने १७ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेतले असता, कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. महिलेसोबत पाच जण दुबईला गेले होते. त्यांच्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचाही शोध पालिकेचे पथक करीत असून, त्यापैकी काही जणांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला की नाही, हे अहवालानंतर उघड होणार आहे.
देशातील सर्वाधिक घनतेचे शहर म्हणून उल्हासनगर प्रसिद्ध असून, येथून परदेशी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेचे वास्तव्य असलेल्या परिसरात वैद्यकीय पथक तैनात केले असून, या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. दुबईहून आलेल्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध महापालिका पथक घेत असून, १२ पेक्षा जास्त जणांचे त्यांच्या घरातच विलगीकरण केल्याचे उघड झाले आहे. गेल्या आठवड्यात दुबईहून परतलेल्यांची संख्या मोठी असून, महापालिकेने त्यांना घरातच थांबवल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
दोन विलगीकरण कक्ष तयार
उल्हासनगर पूर्व आणि पश्चिमेला दोन विलगीकरण कक्षांची स्थापना महापालिकेने केली. २४ तास डॉक्टर पथक, सफाई कामगार व सुरक्षारक्षक या कक्षांमध्ये तैनात असून रुग्णांना दोन्ही वेळचे जेवण, टीव्ही, इंटरनेट सेवा आदी साधने उपलब्ध करून दिली आहेत. ज्यांना विलगीकरण कक्षात राहायचे नाही, त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या राहत्या घरातील एका खोलीत राहता येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.