coronavirus: कोरोना होताच तुटतात नातेवाइकांचे पाश, रुग्णाच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून दिली जात नाही माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 01:42 AM2020-07-10T01:42:31+5:302020-07-10T01:43:08+5:30
कोरोना होताच रुग्ण आपल्या कुटुंबापासून दुरावतो. तो बरा होऊन आला, तर ‘कोरोना योद्धा’ होऊन टाळ्यांनी गौरवित केला जातो. मात्र, त्याचा रुग्णालयातच मृत्यू झाला, तर त्याचे अंत्यदर्शनही कुटुंबाला घेता येत नाही.
- पंकज पाटील
बदलापूर - कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाला भेटण्याची संधी त्याच्या नातेवाइकांना मिळत नाही. त्यातही रुग्ण आॅक्सिजनवर आयसीयूत असेल, तर मोबाइलवर संपर्क होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना सतत चिंता लागून राहिलेली असते. डॉक्टरांकडून रु ग्णाच्या प्रकृतीची योग्य माहिती वेळेवर उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे कोरोना होताच रुग्ण आपल्या कुटुंबापासून दुरावतो. तो बरा होऊन आला, तर ‘कोरोना योद्धा’ होऊन टाळ्यांनी गौरवित केला जातो. मात्र, त्याचा रुग्णालयातच मृत्यू झाला, तर त्याचे अंत्यदर्शनही कुटुंबाला घेता येत नाही.
ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमधील मृतदेह चुकीच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचे प्रकरण व भलत्याच नावाने रुग्णावर सुरू असलेले उपचार हे प्रकार आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीसोबत आतमध्ये सुरू असले तरी, नातलगांना त्याची सुतराम कल्पना नसते.
कोरोनावर उपचार करणारे रुग्णालय सरकारी अथवा खाजगी असो, या दोन्ही ठिकाणी रु ग्णांना भेटण्याची कोणतीच संधी त्याच्या नातेवाइकांना मिळत नाही. कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या वॉर्डांमधील वातावरण भयाण असते. इतर रु ग्णांवर उपचार करताना डॉक्टर, परिचारिकांचा वावर आणि कोरोना रुग्णांवर उपचार करतानाचा वावर यात जमीनअस्मानाचे अंतर असते. कोरोना रुग्णांवर डॉक्टर, परिचारिका शक्य तितके लांब राहून उपचार करतात. ठरलेल्या वेळी रु ग्णांची आॅक्सिजन पातळी चेक करणे, एवढेच काम परिचारिका करताना दिसतात. डॉक्टर आवश्यक त्या वेळेसच रुग्णांची तपासणी करण्यासाठी आयसीयूत जातात. इतर वेळेस रुग्ण आतमध्ये एकटेच असतात. सर्वसाधारणपणे इतर रुग्ण आयसीयूत दाखल असेल, तर परिचारिका, शिकाऊ डॉक्टर यांचा आजूबाजूला वावर असतो. तसा तो कोरोना रुग्ण दाखल असलेल्या कक्षात असत नाही. २४ तासांत दोन ते तीन वेळाच त्यांची तपासणी केली जाते. बाकी वेळेस रुग्णांनी हाक मारली, तरच परिचारिका त्याला प्रतिसाद देतात.
एकदा रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णाचा आणि त्याच्या नातेवाइकांचा संपर्कहा केवळ मोबाइलवरच होतो. रुग्ण आयसीयूत असताना त्याच्याकडे मोबाइल दिला जात नाही. जेव्हा तो आयसीयूतून बाहेर येतो, तेव्हा त्याच्याकडे मोबाइल असतो. ज्या रुग्णाकडे मोबाइल नसतो, तो बरा आहे की नाही, याची माहिती दिली जात नाही. अनेकदा, आता बरे वाटणाऱ्या कोरोना रुग्णाची प्रकृती तासाभरात बिघडून त्याचा मृत्यू होऊ शकतो. समजा, एखादा रुग्ण बरा आहे, असे डॉक्टरांनी रुग्णाच्या नातलगांना सांगितले व तासाभरात तो मरण पावला, तर रुग्णाचे नातलग तासाभरापूर्वी तर तुम्हीच रुग्ण चांगला आहे, असे सांगितले होते, असे सांगून जाब विचारतात. कदाचित, हिंसक होतात. त्यामुळे कोरोनाचा रुग्ण आयसीयूतून बाहेर येत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रकृतीबाबत कुठलीच माहिती द्यायची नाही, असा डॉक्टरांचा खाक्या आहे. रु ग्ण बरा झाला किंवा दगावला, तर नातेवाइकांना कल्पना दिली जाते. शिवाय सध्या डॉक्टर, परिचारिका यांच्यावर कामाचा ताण असल्याने प्रत्येक रुग्णाच्या नातलगांचे शंका-समाधान करणे अशक्य असल्याने कोणतीच माहिती रु ग्णांच्या नातेवाइकांना देत नाहीत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.कोरोना रुग्णांबाबत नातेवाइकांना विश्वासात घेऊन माहिती द्या, आयसीयूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रुग्णाला पाहण्याची व्यवस्था करा, असे आदेश राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिले असले, तरी अनेक खासगी रुग्णालयांनी हे आदेश अमलात आणलेले नाहीत. रुग्णांच्या नातलगांना प्रवेशद्वारातून माघारी पाठवले जाते.
नातेवाइकांनी डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा आग्रह धरला असता, डॉक्टर कोरोना वॉर्डमध्ये आहेत. ते बोलू शकत नाही, असे एकमेव कारण पुढे केले जाते. त्यामुळे रु ग्ण आयसीयूतून बाहेर येईपर्यंत नातेवाइकांचा रक्तदाब वाढलेला असतो. इकडे कोरोना रुग्णाचीही मानसिक अवस्था अत्यंत वाईट होते. आजूबाजूचा एखादा रुग्ण बरे वाटत असताना अचानक मृत्युमुखी पडतो. प्लास्टिकमध्ये बांधून ठेवलेले असे मृतदेह रुग्णांसोबत ठेवल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. अनेक रुग्णांवर या आजूबाजूच्या वातावरणामुळे प्रचंड मानसिक दबाव येतो. आपल्याला कोरोना झाल्यामुळे घरातील व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली असेल का? घरात एखादे लहान मूल असल्यास तेही बाधित झाले असेल का? आपल्यावरील उपचारांकरिता पैशांची तजवीज करताना कुटुंबाची ओढाताण होत असेल का? अशा असंख्य प्रश्नांची वावटळ रुग्णाच्या मनात थैमान घालत राहते. यामुळे काही रुग्ण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचतात. त्यांना उपचार नकोनकोसे वाटतात. रुग्ण घाबरेल म्हणून डॉक्टर त्या रुग्णालाही कोणतीच माहिती देत नाहीत तसेच त्याच्या नातेवाइकांनाही काहीच सांगत नाहीत.
उपचाराची नेमकी माहितीही मिळत नाही कोरोनावरील औषधांचा सध्या प्रचंड काळाबाजार सुरू आहे. तिप्पट ते पाचपट किमतीला कोरोनावरील इंजेक्शन खरेदी करावी लागतात. अनेक इंजेक्शन सहज मिळत नाहीत. ही इंजेक्शन रुग्णांच्या नातलगांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडे प्रवेशद्वारावर जमा करायची. आपण सव्यापसव्य करून आणलेले हे महागडे इंजेक्शन आपल्याच रुग्णाला दिले गेले किंवा कसे, याची खातरजमा करण्याची कुठलीही सोय खासगी रुग्णालयांत नाही.
कोरोना रुग्णांचे मृतदेह जर बदलले जातात, तर आपण आणून दिलेले हजारो रुपयांचे इंजेक्शन चुकीने दुसºया रुग्णाला दिले जाणारच नाही कशावरून, अशी शंका नातेवाइकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. अनेक खाजगी रु ग्णालयांत
रु ग्णांवर नेमके उपचार काय सुरू आहेत, याची माहिती नातेवाइकांना दिली जात नाही.
थेट सहाव्या दिवशी आला मृत्यूचा निरोप
अंबरनाथच्या औषधविक्रेते असलेल्या एका कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याला कोरोनाची लागण झाल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. दाखल झाल्यापासून पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्कझाला नाही. सहाव्या दिवशी थेट त्यांच्या मृत्यूचा निरोप रु ग्णालयातून आल्याने त्यांच्या नातेवाइकांनी रु ग्णालय प्रशासनाच्या उपचारांवरच संशय व्यक्त केला आहे.
जेवणाचा दर्जा चांगला नाही
खाजगी रु ग्णालय असो की सरकारी, तिथे देण्यात येणा-या जेवणाचा दर्जा फारसा चांगला नसतो. अनेक रुग्णांच्या जिभेची चव व वास गेलेला असतो. घरचे जेवण उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने मिळेल ते खाण्याची वेळ रुग्णांवर येते. बहुसंख्य रु ग्णांना जेवणच जात नसल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास विलंब होतो. कोरोनावरील औषधे घेतल्यावर सोबत दर्जेदार अन्नपदार्थांची गरज असते.