Coronavirus : प्रशासनाचा बेजबाबदारपणा, विलगीकरण कक्षातील नावे सोशल मीडियावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 02:16 AM2020-03-21T02:16:48+5:302020-03-21T02:17:08+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक कारवाई सुरू आहे.
अंबरनाथ : परदेशातून आलेल्या नागरिकांचा संपर्क इतरांशी होऊ नये, यासाठी त्या प्रवाशांना विलगीकरण करण्यात आले आहे. वैद्यकीय पथकाच्या नियंत्रणात हे प्रवासी आहेत. त्यांची ओळख उघड होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येत आहे. मात्र, अंबरनाथमध्ये सोशल मीडियावर १४ नागरिकांची एक यादी टाकली आहे. यात विलगीकरण केलेल्या प्रवाशांची नावे आणि त्यांचे पत्तेही दिले आहेत. वैद्यकीय आणि पालिकेच्या पथकामार्फतच ही यादी सोशल मीडियावर आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे विलगीकरण केलेले प्रवासी मानसिक तणावात आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक कारवाई सुरू आहे. परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला त्याच्या घरात किंवा विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. १४ दिवस हे प्रवासी वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत. विलगीकरण केलेल्या प्रवाशांचे नाव गुप्त ठेवण्यात येत आहे. मात्र, सरकारी यंत्रणेतील एका व्यक्तीनेच थेट या विलगीकरण केलेल्या प्रवाशांची यादी सोशल मीडियावर टाकली आहे. ही यादी काही क्षणांतच सर्वत्र गेली. या यादीत प्रवाशाचे नाव, त्याचा पत्ताही देण्यात आला आहे. तसेच तो कोणत्या देशातून आला आहे, याचीही माहिती देण्यात आली आहे.
ही यादी प्रसिद्ध होताच त्या प्रत्येक प्रवाशाला आता चौकशीसाठी फोन केले जात आहेत. प्रत्येकजण चौकशी करत असल्याने त्यांची मानसिकता आणखी बिघडली आहे. सोबत, त्यांचा संतापही वाढत आहे.अनेक व्यक्ती चौकशीच्या नावावर त्या प्रवाशांना कोरोना झाला आहे का, असे विचारत आहेत. प्रत्येकाची समजूत काढण्यातच या प्रवाशांचा वेळ जात आहे. परदेशातून आल्यावर आधीच परिसरातील नागरिक संशयाने पाहत होते. त्यात आता आणखी ही भर पडली आहे. आता शहरातील नागरिकांचेही फोन येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आणि सरकारी यंत्रणेनेही दखल घेतली आहे. ही यादी कशी बाहेर पडली, याचा तपास करण्यात येत आहे.
बदलापूरमध्ये दोन व्यक्ती विलगीकरण कक्षात
बदलापूर कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून, बदलापूरमध्ये परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींची संख्या आता ५६ वर गेली आहे. त्या पैकी दोन व्यक्तींना सोनिवली येथील विलगीकरण कक्षात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच जे नागरिक परदेशवारी करून आले आहेत, त्यांनी निरीक्षण कालावधी पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडू नये. याची खबरदारी त्या व्यक्तीने व त्याच्या कुटुंबांनी घेतली पाहिजे. नगरपालिका प्रशानाकडून त्यांचेही समपुदेशन सुरू आहे. अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण बदलापूरमध्ये आढळला नसला तरी परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींवर नगरपालिका, पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बार, बीअर शॉप, वाइनशॉप, पानटपऱ्या, चायनीज, वडापाव, लस्सी, सरबतच्या हातगाड्या, रस्त्यावरील विक्रेते, खाद्यपदार्थ गुरुवारी रात्री १२ पासून बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली.
कोरोनाबाधित किंवा संशयित व्यक्तींची तसेच विलगीकरण केलेल्या प्रवाशांची यादी सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच या प्रवाशांना त्रास देणाºयांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल.
- विनायक नराळे, सहायक पोलीस आयुक्त
तो कोरोनाबाधित नाही
बदलापूरमध्ये बुधवारी एक कोरोना संशयित आढळल्याचा संदेश सोशल मीडियावर फिरत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या अनुषंगाने या व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्या २८ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली आहे.