coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी जनकल्याण समिती, युवकांचा पुढाकार, डोंबिवलीत घरोघरी जाऊन करणार स्क्रिनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 01:19 AM2020-07-05T01:19:45+5:302020-07-05T01:19:58+5:30
डोंबिवली, कल्याण आदी भागात जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, अशा ठिकाणी हे कोरोना योद्धे कार्यरत राहतील. त्यांना रोज पाच तास याप्रमाणे सात दिवस हे काम करावे लागणार आहे.
डोंबिवली - धारावी, पुणेपाठोपाठ आता डोंबिवलीतही कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते निवडून त्यांच्यामार्फत काही निवडक भागामध्ये घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान तपासणी (स्क्रिनिंग) करण्यात येणार आहे, ही मोहीम मंगळवारी सुरू होणार असून आ. रवींद्र चव्हाण, समितीचे जिल्हा कार्यवाह निलेश काळे यांनी त्यासंदर्भात शुक्रवारी सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळ, दहीहंडी मंडळ, नवरात्र मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
जनकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कोरोना योद्धे काम करतील आणि संकलित झालेली माहिती महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सुपूर्द करतील, असे चव्हाण म्हणाले. डोंबिवली, कल्याण आदी भागात जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, अशा ठिकाणी हे कोरोना योद्धे कार्यरत राहतील. त्यांना रोज पाच तास याप्रमाणे सात दिवस हे काम करावे लागणार आहे. शहरातील काही शाळांमध्ये एका शाळेत ४० याप्रमाणे या युवकांची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्या युवकांना पीपीई किट घालणे अत्यावश्यक आहे, तसेच त्यांची रोज आरोग्यतपासणी होणार आहे. त्यांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. जनकल्याण समिती, महापालिका आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ते कार्यरत राहतील.
या विषयासंदर्भात महापालिका आयुक्तांसमवेत अलीकडेच एक महत्त्वाची बैठक संघाचे पदाधिकारी, माजी आ.डॉ. अशोक मोडक आणि आ. चव्हाण यांच्यासमवेत झाली. ज्या युवकांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी जनकल्याण समितीच्या माध्यमातून आॅनलाइन वितरित करण्यात आलेला फॉर्म भरावा. आधारकार्ड, दोन पासपोर्ट साइज फोटो जमा करावे. त्यानंतर, त्यांची आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे. देशकार्यात जास्तीतजास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे जिल्हा कार्यवाह निलेश काळे यांनी केले. लॉकडाऊनच्या काळात प्रामुख्याने वस्त्यांमधील रहिवाशांची तपासणी व्हावी, अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली.