CoronaVirus : उल्हासनगर महापालिकेत डॉक्टरांसह अन्य पदाची जम्बो भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 06:00 PM2021-04-09T18:00:51+5:302021-04-09T18:01:40+5:30
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, महापालिकेला आरोग्य सुविधेबाबत राज्य शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून होते.
उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णाची उपचारादरम्यान हेडसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर महापालिकेने डॉक्टरांसह अन्य पदाची तात्पुरत्या स्वरूपात जम्बो भरती सुरू केली. डॉक्टरांची ४५, परिचारिका २६६, वॉर्डबॉय ३१ यांच्यासह अन्य पदे भरण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. (CoronaVirus: Jumbo recruitment of doctors and other posts in Ulhasnagar Municipal Corporation)
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, महापालिकेला आरोग्य सुविधेबाबत राज्य शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून होते. कोरोना महामारीत रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महापालिकेने खाजगी साई प्लॅटिनम रुग्णालय दरमहा २० लाख रुपये भाडेतत्वावर घेतले. दरम्यान, कोरोना रुग्णाची संख्या सातत्याने वाढत असल्याने, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे.
आरोग्य सेवेवर ताण पडू नये, म्हणून आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडी, मदन सोंडे, वैधकीय अधिकारी दीपक पगारे, डॉ राजा रिजवानी, डॉ अनिता सपकाळे आदींनी डॉक्टरसह अन्य पदे तात्पुरत्या स्वरूपात भरतीचा करण्याचा निर्णय घेतला. वाढत्या कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी, महापालिका शाळा इमारती मध्ये कोरोना आरोग्य सुविधा केंद्र सुरू करण्याचे संकेत दिले.
महापालिका कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी फिजिशियन डॉक्टरची १०, भुलतज्ञ डॉक्टरची १०, वैधकीय अधिकाऱ्याची २५, परिचरिकेची २६६, प्रयोगशाळा तज्ञ ६, औषध निर्माता ६ वॉर्डबॉयची ३१ असे एकून ३५३ पदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी महापालिकेने डॉक्टरसह अन्य पदे तात्पुरत्या स्वरूपात भरती केले होते.
दरम्यानच्या काळात कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्याने, अनेक डॉक्टरसह अन्य कर्मचारी महापालिका नोकरी सोडून गेले. त्यामुळे डॉक्टरसह अन्य पदे भरण्याची वेळ हापालिकेवर आली. दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने डॉक्टरसह ३५३ पदे भरती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरसह अन्य पदाची भरती केल्यास रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देता येईल . अशी प्रतिक्रिया उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद
भरतील डॉक्टरांचा प्रतिसाद महापालिकेने डॉक्टरसह अन्य पदाची भरती सुरू केली असून आजच्या डॉक्टर भरतीला डॉक्टरांनी चांगला प्रतिसाद दिला. तर परिचारिकासह अन्य पदाची भरती सोमवार ते शुक्रवार दरम्यान होणार आहे.