CoronaVirus News: कळवा, सिव्हिल हॉस्पिटलच्या चुकीमुळे गर्भवतीला मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 01:01 AM2020-06-14T01:01:57+5:302020-06-14T06:49:38+5:30

भोंगळ कारभार चव्हाट्यावर; दुसऱ्याच महिलेचा रिपोर्ट पाठवला पुढे; आडनावातील साधर्म्यामुळे झाली चूक

CoronaVirus kalwa hospital mistakenly gives corona positive report to pregnant women | CoronaVirus News: कळवा, सिव्हिल हॉस्पिटलच्या चुकीमुळे गर्भवतीला मनस्ताप

CoronaVirus News: कळवा, सिव्हिल हॉस्पिटलच्या चुकीमुळे गर्भवतीला मनस्ताप

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटलच्या गोंधळामुळे एका नऊ महिन्यांच्या गर्भवतीला मनस्ताप सहन करावा लागला आहे. कळवा रुग्णालयाने ११ जूनला या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला. त्यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड कक्षात ठेवले. मात्र, तिचे सीझर करणे आवश्यक असल्यामुळे तिला मुंबईतील नायर रुग्णालयात पाठवले. तेथे सिव्हिलने पाठवलेला रिपोर्ट या महिलेचा नसल्याचे उघड झाले. केवळ आडनावातील साधर्म्यामुळे चुकीचा रिपोर्ट पाठवल्याची कबुली सिव्हिल रुग्णालयाने दिली आहे.

निगेटिव्ह असताना केवळ कळवा हॉस्पिटलच्या चुकीच्या रिपोर्टमुळे या महिलेला सिव्हिलच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला लागण झाल्याचा आरोप या महिलेच्या पतीने केला आहे. हे सर्व प्रकरण सावरण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. तर सिव्हिल हॉस्पिटलने दुसºया महिलेचा दिला असल्याची कबुली दिली आहे. तसेच ही महिला पॉझिटिव्हच होती, असा खुलासा पालिका प्रशासनाने केला आहे. केवळ सिव्हिलच्या गफलतीमुळे हा प्रकार घडल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कशेळीतील ३४ वर्षीय महिलेला दिवस पूर्ण झाल्यामुळे बाळकूमच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. कोविडची टेस्ट करण्यासाठी तिला कळवा हॉस्पिटलला पाठवले. तिचा रिपोर्ट आल्यानंतर रुग्णालयांतील भोंगळ कारभारामुळे कळवा हॉस्पिटल ते सिव्हिल आणि नंतर नायर हॉस्पिटल असा प्रवास तिला एकटीला करावा लागला. ठाण्यातील मंगेश जोशी यांनी मुंबईत जाऊन तिला आधार देत पुन्हा ठाण्यात आणले. सोशल मीडियावरून हा सर्व प्रकार त्यांनी उघड करताच मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कळवा रुग्णालय गाठून या महिलेला दाखल करून घेतले. ही महिला कशेळीत राहणारी असून जिचा रिपोर्ट या महिलेला देण्यात आला होती, ती पॉझिटिव्ह महिला वाशी येथे राहणारी आहे. संध्यकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत काहीही दोष नसताना वणवण करावी लागल्यामुळे तिच्या डोळ्यांत पाणी आले. यापूर्वी चुकीचा रिपोर्ट देणाºया एका खाजगी लॅबवर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे; मात्र आता पालिकेच्याच लॅबने चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित व्यक्तींवर कडक कारवाईची मागणी जाधव यांनी केली आहे.

‘रुग्णालयाच्या चुकीमुळे माझी पत्नी कोरोना पॉझिटिव्ह’
कळवा रुग्णालयात ९ जूनला टेस्ट केल्यानंतर ११ जूनला ती पॉझिटिव्ह असल्याचा आम्हाला फोन आला. मात्र, रिपोर्ट दिला नाही. सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या पत्नीला नेल्यानंतर तिला तेथून नायर हॉस्पिटलला एकटीला पाठवले. नायर रुग्णालयाने हा रिपोर्ट मागितल्यानंतर हा रिपोर्ट दुसऱ्या महिलेचा होता. केवळ आडनाव समान होते, हे स्पष्ट झाले. मात्र, पॉझिटिव्ह समजून एक दिवस सिव्हिलच्या कोविड कक्षात पत्नीला ठेवले आणि तिथे निगेटिव्ह असताना तिला कोरोनाची लागण झाल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे.

अतिशय गंभीर हा प्रकार असून याची दखल स्वत: महापालिका आयुक्तांनी घेतली पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे

Web Title: CoronaVirus kalwa hospital mistakenly gives corona positive report to pregnant women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.