Coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 5 नवे रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 43वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 04:39 PM2020-04-09T16:39:07+5:302020-04-09T16:39:31+5:30
नव्याने आढळून आलेल्या पाच रुग्णापैकी दोन डोंबिवली पूर्वेतील, एक डोंबिवली पश्चिमेतील आणि दोन कल्याण कल्याण पूर्वेतील रुग्ण आहेत. पाचही रुग्ण या महिला आहेत.
कल्याण-कल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 43 झाली आहे. महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरत आहे. नव्याने आढळून आलेल्या पाच रुग्णापैकी दोन डोंबिवली पूर्वेतील, एक डोंबिवली पश्चिमेतील आणि दोन कल्याण कल्याण पूर्वेतील रुग्ण आहेत. पाचही रुग्ण या महिला आहेत.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका मुख्यालयात येणारे महापालिकेचे कर्मचारी व अधिका-यांनी त्यांच्या तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयात आल्यापासून कार्यालय सोडण्यापर्यंत हा मास्क लावला गेला पाहिजे. त्याचबरोबर महापालिका मुख्यालयात येणा-या नागरिकांनी मास्क लावूनच महापालिका मुख्यालयात यावे. अन्यथा त्याना मुख्यालयात प्रवेश नाकारला जाईल, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिले आहे.
दरम्यान महापालिका हद्दीतील गर्दी टाळण्यासाठी औषधांची दुकाने, रुग्णालये, दवाखाने, गॅस वितरक एजेन्सी वगळता बेकरी, डेअरी, किराणा, भाजीपाला व खाद्यपदार्थाची दुकाने दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत बंद ठेवण्यात यावीत, असे आदेश आयुक्त सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी उद्या 10 एप्रिलपासून करण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.