Coronavirus: केडीएमटी वाहकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू; आणखी चौघांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:26 AM2020-06-29T03:26:04+5:302020-06-29T03:26:17+5:30
मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा कोरोना विमा लागू करावा या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी महापालिका कामगार कर्मचारी संघटनेतर्फे वारंवार करण्यात आली आहे
कल्याण : कोरोनाबाधित केडीएमटी चालकाचा गुरुवारी खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे कोरोनामुळे एका वाहकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ५० वर्षीय वाहकावर ठाणे सिव्हिल येथे उपचार सुरू होते. एका सहाय्यक वाहतूक निरीक्षकासह दोन वाहक आणि एक महिला शिपाई अशा उपक्रमातील चौघांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा कोरोना विमा लागू करावा या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी महापालिका कामगार कर्मचारी संघटनेतर्फे वारंवार करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र ५ मे रोजी देण्यात आले होते. कोरोनामुळे एखादा अधिकारी किंवा कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरीत सामावून घ्यावे. कोरोना वैद्यकीय चाचणी तातडीने करण्यात यावी. जे कर्मचारी कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळावा या मागण्यांकडेही लक्ष वेधले होते. आजतागायत यातील कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही. आतापर्यंत उपक्रमातील सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला तर एकाने कोरोनावर मात केली आहे तर चार जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
व्यवस्थापकांशी फोनवर चर्चा
कोरोनाची लागण होण्याचे वाढते प्रमाण पाहता आता तरी मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी कामगार कर्मचारी संघटनेने केली आहे. रविवारी पदाधिकाºयांनी उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. सोमवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन खोडके यांनी दिल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष कृष्णा टकले यांनी दिली.
कल्याण-डोंबिवलीत ३६९ नवे कोरोना रुग्ण
कल्याण : केडीएमसीच्या हद्दीत कोरोनामुळे रविवारी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १०७ इतकी झाली आहे. दुसरीकडे कोरोनाचे ३६९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या पाच हजार ६७८ इतकी झाली आहे. तर तीन हजार ३७२ रुग्णांवर उपचार सुरू असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजार १९९ असल्याची माहिती केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून केडीएमसी क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यामुळेच अधिक कडक निर्बंध घालण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे.