Coronavirus: दंत महाविद्यालय होणार कोविड रुग्णालय; ५०० खाटांची होणार सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 01:23 AM2020-05-08T01:23:21+5:302020-05-08T01:23:29+5:30
अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केली तयारी
अंबरनाथ : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता अंबरनाथमध्येही रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. भविष्याचा विचार करुन अंबरनाथ पालिकेने ५०० खाटांचे रुग्णालय दंत महाविद्यालयात सुरू करण्याची तयारी केली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशामुळे प्रत्येक शहरात रुग्णालयाची सोय उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार पालिकेने दंत महाविद्यालय ताब्यात घेऊन त्या ठिकाणी अधिकाधिक रुग्णांना सामावून घेता येईल याचा विचार सुरु केला आहे. तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीची मागणीही जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेने शहरात रुग्णांची संख्या वाढल्यावर उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येक शहरात कारोनाबाधितांवर उपचार करणारी यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंबरनाथ नगरपालिकेने ५०० ते ८०० रुग्णांवर उपचार करता येईल अशी यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
शहरातील शाळा, महाविद्यालय, सभागृह आणि इमारती यांची चाचपणीही प्रशासनाने केली आहे. त्यानंतर अंबरनाथ पालिकेने बंद अवस्थेत असलेले दंत महाविद्याल कोवीड रुग्णालयासाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे. जे कोरोनाबाधित आहेत मात्र त्यांच्यात लक्षणे दिसत नाहीत अशा ३००, त्यांच्यात कारोनाचे लक्षण आहेत मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे अशा ३०० रुग्णांसाठी आणि ज्यांची प्रकृती कोरोनामुळे खराब झाली आहे त्यांना आॅक्सिजनची गरज आणि काहींना व्हेंटिलेटरची गरज आहे अशा २०० रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे प्रयत्न पालिकेने सुरु केले आहेत. त्यात अंबरनाथचे सिटी रुग्णालयही ताब्यात घेतले आहे. मात्र ही यंत्रणा राबविण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आणि यंत्र सामग्रीचा प्रस्ताव अंबरनाथ पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. तत्पूर्वी दंत महाविद्यालयातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
अद्याप यंत्रसामग्री नाही : अंबरनाथ पालिकेने रुग्णालय सुरू करण्याची तयारी केली असली तरी अद्याप त्यांना कोणतीही यंत्रसामग्री मिळालेली नाही. त्यामुळे अंबरनाथ पालिकेला जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यंत्रसामग्री आणि डॉक्टर उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अंबरनाथमध्ये रुग्णालय सुरु करण्यात अडचणी येणार आहेत.