Coronavirus: वाचनालये झाली सुरू; पुस्तके मिळाल्याने वाचकांना झाला अत्यानंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:49 AM2020-10-17T00:49:53+5:302020-10-17T00:50:08+5:30
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळत पहिल्याच दिवशी गाठली ग्रंथालये
कल्याण : मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली वाचनालये, ग्रंथालये अखेर गुरुवारी वाचन प्रेरणा दिनापासून खुली झाली आहेत. त्यामुळे चोखंदळ वाचकांनी कोरोनाचे नियम पाळत सकाळीच ग्रंथालये गाठू न नवनवीन पुस्तके घेतली. ही पुस्तके मिळताच त्यांना अत्यानंद झाला.
शालेय जीवनापासून विद्याथ्र्याना वाचनाची आवड लागावी, यासाठी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून राज्यभरात वाचनालये सुरू झाली आहेत. अनेक वाचकांनी गुरुवारी पहिल्या दिवशीच कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयात जाऊन आपल्या आवडीची पुस्तके वाचण्यासाठी घेतली.
कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपल्या घरातील जुनी पुस्तके पुन्हा काढून त्यांचे वाचन केले. मात्र, सात महिने वाचनालये बंद असल्याने नवीन पुस्तकांअभावी त्यांची गैरसोय झाली. तर, अनेकांनी ऑनलाइन माध्यमाद्वारे विविध संकेतस्थळे, अपयद्वारे ई-पुस्तकांचे वाचन केले. मात्र, पुस्तके ही हातात घेऊनच वाचण्याचा आनंद वेगळाच असल्याचे काही वाचकांनी सांगितले. दरम्यान, डोंबिवलीतील पै फ्रेण्ड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी वाचनाचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले. अनेक महिन्यांपासून पुस्तकापासून दूर झालो होतो. मात्र, आता नव्याने पुस्तक वाचन सुरू करणार आहे. ए.पी.जी. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त ही सुरुवात झाली, हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे, असे आंबिवलीतील विद्यार्थी सदानंद बडक म्हणाला.
पुन्हा जाेमाने वाचन!
जुनी पुस्तके पुन:पुन्हा वाचून कंटाळा आला होता. आता वाचनालयात जाऊन नवीन पुस्तके घेणार आहे. पुन्हा नव्या जोमाने काम सुरू करणार आहे, असे चिकणघर येथे राहणारा नवीन नितनवरे यांनी सांगितले.