Coronavirus : ठाणे पालिका मुख्यालयात नागरिकांना मर्यादित प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:18 AM2020-03-18T01:18:39+5:302020-03-18T01:19:03+5:30
नागरिकांनी त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या वेबसाइटवरील संबंधित विभागाशी ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
ठाणे : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समितीमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना पुढील आदेशापर्यंत अत्यावश्यक कामकाज वगळता प्रवेश मर्यादित करण्यात आले आहेत. दरम्यान, नागरिकांनी त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या वेबसाइटवरील संबंधित विभागाशी ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने काढलेल्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या वतीने मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका भवनात होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने नागरिकांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या वेबसाइटवरील संबंधित विभागाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. प्राप्त ईमेलवरील रीतसर कार्यवाही करून सात दिवसांत नागरिकांना ईमेलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ईमेलद्वारे पाठविण्यात यावेत, तसेच ठाणे महानगरपालिका कार्यालयात दैनंदिन टपाल व इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाºया कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक विभागाच्या वतीने प्रवेशद्वारावरच टपाल स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेचा कर व अन्य देय रकमांसाठी नागरिकांना डिजिटल आॅनलाइन सेवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आॅफलाइन कर व तत्सम भरणा करण्यासाठी मर्यादित स्वरूपात महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये प्रवेश देण्याची दक्षता सुरक्षा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्व विभागप्रमुख/अधिकारी यांच्याकडे होणाºया बैठका तातडीच्या असल्या, तरच आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकांसाठी बाहेरील अधिकारी अथवा खासगी व्यक्तींना आमंत्रित करण्यात येणार नाही. कर्मचाºयांच्या दैनंदिन हजेरीसाठी वापरण्यात येणारी बायोमेट्रिक मशीनची हजेरी प्रक्रि या बंद करण्यात येत असून, प्रत्येक विभागामध्ये हजेरीपट ठेवून त्याद्वारे हजेरीची नोंद ठेवण्यात येणार आहे.
ठाणे न्यायालयाचे कामकाज पहिल्याच सत्रात राहणार
ठाणे: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारपासून ३१ मार्चपर्यंत ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज पहिल्याच सत्रात सुरू राहणार असून, त्यानंतर (जेवणानंतर) काम पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहे. कोरोनामुळे न्यायालयात येणाºयांची संख्याही कमी झाली आहे. वकील संघटनेने तीन बार रूममध्ये सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवल्या असून, वकील सदस्यांना मास्कचेही वाटप केले आहे. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात जवळपास ६० न्यायालय आहेत. ठाणे जिल्हा वकील संघटनेचे एकूण चार हजार सदस्य आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात दिवसाला साधारणत: दोन हजार नागरिकांची ये-जा सुरू असते. यामध्ये पोलिसांसह कैदी आणि साक्षीदार तसेच पक्षकारांचा समावेश आहे. ही गर्दी कमी होऊन दिवसाला ५००च्या आसपास आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारपासून संघटनेचे तिन्ही बार रूम, लायब्ररी, आयटी लायब्ररी, कॅन्टीन सकाळी १०.३० वाजता उघडून दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात येतील. न्यायालयाची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ राहणार असल्याची माहिती संघटनेने दिली.
संघटनेमार्फत मास्कचे वाटप : ठाणे जिल्हा वकील संघटनेने मंगळवारी बार रूममध्ये मास्कचे वाटप केले. या वेळी जवळपास २०० मास्कचे वाटप करण्यात आले असून, मास्क लावून सदस्य काम करताना दिसले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज सुरू राहणार आहे. २.३० नंतर न्यायालयातील बार रूम आणि कॅन्टीन बंद होणार आहे. ३१ मार्चपर्यंत कामाची वेळ हीच राहणार आहे. पक्षकारांसह साक्षीदारांची संख्या कमी झाल्यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी झाले आहे.
- प्रकाश कदम, अध्यक्ष,
ठाणे जिल्हा वकील संघटना
पोषण पंधरवडा कोरोनामुळे रद्द
ठाणे : जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटाच्या बालकांमधील कुपोषण कमी करण्यासह किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्ताल्पता (अनेमिया) आणि वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने पोषण पंधरवडा सुरू केला होता. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी तो बंद केला आहे. या भीतीमुळे ग्रामीणच्या अंगणवाडी केंद्रदेखील बंद करण्याची मागणी सेविकांकडून होऊ लागली आहे. जिल्ह्यातील सर्व गावपाड्यांमध्ये महिला व बाल विकास विभागाकडून हा पंधरवडा २२ मार्चपर्यंत राबवण्यात येणार होता.
कोरोनामुळे पोषण पंधरवाडा बंद करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाने सोमवारी जारी केले आहेत, यामुळे जिल्ह्यात सुरू असलेला हा पंधरवडा पुढील आदेश येईपर्यंत बंद केला आहे. कोरोनाची भीती लक्षात घेऊन पालक त्यांच्या बालकांना अंगणवाडीत पाठवत नाहीत, यामुळे ग्रामीणमधील अंगणवाडी केंद्रही काही दिवस बंदची मागणी सेविकांकडून होऊ लागली आहे. महापालिका, नगरपालिकांच्या शहरी भागातील अंगणवाडी केंद्र बंद केले आहेत. त्याप्रमाणेच ग्रामीण व दुर्गमभागातील अंगणवाड्याही बंद करण्याच्या आदेशाची अपेक्षा आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरबदारीची बाब म्हणून ठाणे महानगरपालिकेने येत्या २० मार्च रोजी होणारी महासभा रद्द केली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत महासभा घेतली जाणार नसल्याचेही पालिकेच्या सचिव विभागाने स्पष्ट केले आहे.