CoronaVirus Lockdown : निर्बंधांमुळे डीजे, डेकोरेटरवाल्यांचा वाजला बॅण्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 12:00 AM2021-04-11T00:00:46+5:302021-04-11T00:01:21+5:30
CoronaVirus Lockdown : लग्नांबरोबरच मार्च, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकांचे कॅमिनियन असतात (मुलांना धर्माची दीक्षा देणे) हे माणिकपूर, चुळणा, दिवानमानसह पश्चिम किनारपट्टीवर शेकडोच्या प्रमाणात होतात.
- सुनील घरत
पारोळ : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने पुन्हा एकदा लग्नसमारंभांवर निर्बंध आले असल्याने त्याचा फटका वसई तालुक्यातील मंडप डेकोरेटर, डीजे यांना बसला असून, त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे, तर अनेक डेकोरेटर्सजवळील माणसे लाॅकडाऊनच्या भीतीने गावाला जाऊ लागल्याने त्याचाही फटका मंडप डेकोरेटर्सना बसू लागला आहे. याबरोबर या व्यवसायाशी निगडित इतर व्यवसायिकही देशोधडीला लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वर्षीचा लग्नाचा हंगाम कोरोनाच्या महामारीमुळे वाया गेला असतानाच यावर्षी दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लग्नाचा हंगाम चांगला जाऊन थोडेफार उभे राहता येईल, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ऐन लग्नसराईत लग्नसमारंभांवर अनेक निर्बंध आले आहेत. त्याचा फटका मंडप डेकोरेटर, साउण्ड सिस्टीमवाले, बॅण्डवाले, बँज्योवाले, वाटपे अशा व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या असंख्य कुटुंबांना बसू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने लग्नसमारंभासाठी फक्त ५० लोकांची अट घालण्यात आल्याने मंडप लहान झाले, तर जेवणाची ऑर्डरही फक्त ५० लोकांची असल्याने खर्चही निघत नसल्याने त्याचा फटका आचारी लोकांना बसत आहे.
लग्नांबरोबरच मार्च, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकांचे कॅमिनियन असतात (मुलांना धर्माची दीक्षा देणे) हे माणिकपूर, चुळणा, दिवानमानसह पश्चिम किनारपट्टीवर शेकडोच्या प्रमाणात होतात. हा विधीही लग्नाप्रमाणेच होत असल्याने त्यावरही बंधने आल्याने त्याचा फटका मंडप डेकोरेटर्सना बसला आहे.
लॉकडाऊनची भीती, कामगार गावी
गेल्या वर्षी तर मंडप डेकोरेटर्सनी कसे तरी आपल्याजवळील कामगारांना सावरले होते; परंतु आता लग्नसमारंभांवरच बंधने आल्याने त्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊनच्या भीतीने कामगारांनी गावाकडची वाट धरल्याने त्याचा फटकाही बसणार आहे. गेल्या वर्षभरात काम नसल्याने अनेक मंडप डेकोरेटर कर्जबाजारीपणामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यातच काही महिन्यांपूर्वी मिळालेल्या मोठ्या ऑर्डर रद्द होत आहेत, तर काही ऑर्डर ५० लोकांच्याच मिळत असल्याने आता जगायचे कसे, असा प्रश्न यांच्यापुढे उभा राहिला आहे.