CoronaVirus Lockdown: मृताच्या कुटुंबीयांना मदत करण्यास शेजाऱ्यांचा नकार; मुस्लिम बांधवांनी केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 03:17 PM2020-05-02T15:17:10+5:302020-05-02T15:19:13+5:30
लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे दर्शन
कल्याण: ह्रदयविकारामुळे वयाच्या 70 व्या वर्षी प्रभा कलवार यांचा मृत्यू झाला. कलवार यांच्या मुलांनी शेजाऱ्यांना हाक दिली. मात्र शेजारी कोरोनाच्या भीतीपोटी पुढे आले नाहीत. अखेरीस मुलाच्या मदतीला त्याचे मुस्लिम समाजातील मित्र धाव आले. मुस्लिमांच्या मदतीने कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे दर्शन घडले.
कलवार यांची दोन मुले परदेशात वास्तव्याला आहे. एक मुलगा नाशिक येथे राहतो. दोन मुले त्यांच्यासोबत राहतात. कलवार या आजारी होत्या. त्या भोईवाडा येथे राहत होत्या. पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. यावेळी त्यांच्या मुलांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक दिली. मात्र शेजाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही पुढे आले नाही. कलवार या पूर्वी रोहिदास वाड्यात राहत होत्या. त्याठिकाणी त्यांच्या मुलांचे काही मुस्लिम मित्र होते. सध्या रमजान सुरु असल्याने मुस्लिम बांधव पहाटेच उठतात. त्यांना रोझाची तयारी करावी लागते. कलवार यांच्या मुलाने आईची प्रकृती खालावल्याचे मित्र शाकीर शेख यांना कळवले. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी भोईवाड्यात धाव घेतली.
शाकीर यांनी त्यांचे मित्र पप्पू शेख, तौसिफ बागवान, सलमान शेख, कमरुद्दीन शेख, फारीख बीजापूर यांच्या मदतीने रिक्षा करुन कलवार यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच कलवार यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. कलवार यांचा मृतदेह घरी नेल्यावर त्यांच्या अंत्यविधीची तयारी केली. हिंदू समाजात अंत्यविधी कसा केला जातो हे जाणून घेतले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत बैलबाजार स्मशानभूमीत कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. रजझानच्या पवित्र महिन्यात शाकीरसह त्यांच्या मुस्लिम बांधवांनी माणुकीचा धर्म जपला आहे.