CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊन झाल्यास उद्योग परराज्यात जातील; ‘आमा’च्या अध्यक्षांची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 12:23 AM2021-04-05T00:23:31+5:302021-04-05T00:23:39+5:30
गेल्यावर्षीची भरपाई झालेली नाही, नियमांचे होत आहे पालन
- पंकज पाटील
अंबरनाथ : कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय योग्य ठरणार नाही. गेल्यावर्षी केलेल्या लॉकडाऊनमध्ये जे नुकसान झाले आहे त्याचीच भरपाई अद्याप कारखानदारांची झालेली नाही. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्यास अंबरनाथचे नव्हे तर महाराष्ट्रातील उद्योग हे परराज्यात निघून जातील आणि महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात मागे पडेल असे मत अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी व्यक्त केले.
अंबरनाथमध्ये जे कारखानदार आहेत त्या कारखान्यात कामगार सर्व नियम आणि अटींचे पालन करीत आहेत. कारखान्यांमध्ये काम करत असताना कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातच कारखानदार आपल्या कारखान्यात सुरक्षेची यंत्रणा वापरात असल्याने आणि कामगारांची पूर्ण काळजी घेत असल्याने उद्योग किंवा कारखानदारी क्षेत्रात कोरोनाचा प्रसार होण्याचे प्रमाण अल्पच राहणार आहे. मात्र राज्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याच्या भूमिकेत दिसत असल्याने ही भूमिका कारखानदारांनासाठी घातक ठरू शकेल, असे मत तायडे यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अंबरनाथमधील उद्योग पूर्णपणे ठप्प झाले होते, असे असतानादेखील सरकारने कोणतीही मदत कारखानदारांना केली नाही.
एवढेच नव्हे तर कारखानदारांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजही कमी केले नाही. त्यामुळे कारखानदारांना त्यांचा भुर्दंड सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर पाण्याचे आणि विजेच्या बिलांची थकबाकीही व्याजासह वसूल करण्यात आली आहे.
त्यामुळे आधीच कारखानदारांनमध्ये संतापाचे वातावरण असताना पुन्हा लॉकडाऊन करणे म्हणजे अंबरनाथला आणि सोबतच महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात मागे नेण्याचा प्रकार म्हणता येईल.
अंबरनाथमध्ये लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्याऐवजी कारखान्यात काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना संघटनेच्या माध्यमातून लसीकरणाची मुभा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कोरोनाची लस संघटनेला पुरविल्यास संघटना स्वखर्चाने कामगारांना लस देऊन कोरोनाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकते. थेट लॉकडाऊन करण्यापेक्षा लसीकरणाच्या मोहिमेवर भर देण्याची गरज आहे. लसीकरणाची क्षमता वाढविल्यास लॉकडाऊनची गरज पडणार नाही आणि कामगारही सुरक्षित राहील.
कामगार गावी निघून जातील
दुसरीकडे लॉकडाऊन होणार म्हटले तर अनेक उत्तर भारतीय कामगार आपल्या गावी निघून जातील आणि उद्योग आणि कारखानदारी क्षेत्रात काम करणारे कामगार शिल्लक राहणार नाहीत. प्रत्येक कामगार स्वतःची सुरक्षा घेऊन काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे केवळ लॉकडाऊन हा कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या पर्याय होऊ शकत नाही. - उमेश तायडे, अध्यक्ष, आमा संघटना